बांधकाममंत्री भुजबळ घेणार आढावा

राज्यातील रस्ते प्रकल्पांवर झालेला खर्च आणि त्याच्या वसुलीसाठी जागोजागच्या टोलनाक्यांवर प्रवासी व वाहनधारकांच्या होणाऱ्या लुटीवर माहिती अधिकारातून प्रकाश टाकणाऱ्या ‘टोलचे गौडबंगाल’ या वृत्त मालिकेची सरकारने दखल घेतली आहे. या संदर्भात उद्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ टोलधोरणाचा आढावा घेणार आहेत.
रस्ते प्रकल्पांवर झालेल्या खर्चापेक्षा किती तरी पटीने टोलवसुली केली जात आहे. कंत्राटदार कंपन्यांना झुकते माप देण्याची तरतूद टोल धोरणातच करण्यात आली आहे. त्याचा फटका वाहनधारक व प्रवाशांना बसत आहे. ‘लोकसत्ता’ने माहिती अधिकारातून राज्यभरातून विविध रस्ते प्रकल्पांवर झालेला खर्च, त्यावर करण्यात आलेली टोलवसुली यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. राज्यातील ४५ प्रकल्पांवर झालेला खर्च व प्रत्यक्षात गेल्या १२ वर्षांत वसूल झालेली टोलची रक्कम याचा ताळेबंद मांडला असता, कंत्राटदारच मालामाल झाल्याचे दिसते. या वृत्त मालिकेची भुजबळ यांनी दखल घेतली आहे. उद्या या संदर्भात ते वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन टोलधोरणाचा आढावा घेणार आहेत.