उद्या (बुधवारी) सकाळपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा अल्टिमेटम सरकारकडून देण्यात आला आहे. तसेच टीव्ही वृत्तानुसार, हजर न झाल्यास त्यांच्या बदली कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही राज्य परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

सणासुदीच्या काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या कर्मचाऱ्यांना आज (मंगळवारी) सायंकाळी ५ वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. कामावर रुजू न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे हे आवाहन धुडकावले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरुच राहिल अशी भूमिका घेतली आहे.

सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच इतर मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या काळात संपाचे हत्यार उपसले आहे. गाड्या रस्त्यावर आणायच्याच नाहीत अशी भुमिका घेऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांच्या संपाला दाद न देता खासगी बस गाड्या आगारात बोलावून प्रवाशांची सोय करुन दिली. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांना आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. अन्य़था कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. एसटीच्या कामगारांना न्यायालयानेही संपावर जाण्यास प्रतिबंध केल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

दरम्यान, आम्ही संपावर ठाम आहोत. कर्मचाऱ्यांवर सरकारच्या या अल्टिमेटमचा काहीही परिणाम होणार नाही. कंत्राटी कामगार प्रशिक्षित नसतात, त्यामुळे बदली कामगार घेणे एवढे सोपे नाही. हा प्रकार म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळण्यासारखे आहे, असे इंटक या कामगार संघटनेचे नेते जयप्रकाश छाजेड यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे.