राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आणि परस्पर अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यावरून रंगलेला वाद ताजा असतानाच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य सरकारला आणखी एक दणका दिला आहे. ‘महाराष्ट्र व्हिलेज फॉरेस्ट रूल्स २०१४’ च्या अंमलबजावणीस देण्यात आलेली स्थगिती तात्काळ अंमलात आणण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
आदिवासींसाठी केंद्राने पंचायत राज विस्तार (पेसा) आणि अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) असे दोन कायदे लागू केले. त्यनुसार आदिवासींना वैयक्तिक , तसेच सामूहिक वनहक्क मिळाले. त्यामध्ये गौण वनोपज उत्पादन गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे, शेती करणे असे अनेक अधिकार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कायद्यामुळे बांबूच्या लिलावाचे आजवर वनविभागाकडे असलेले हक्क ग्राम वनहक्क समित्यांना मिळाले आहेत. या दोन्ही कायद्यांच्या आधारे राज्य सरकारनेही ‘महाराष्ट्र व्हिलेज फॉरेस्ट रूल्स २०१४’ ही नियमावली मेमध्ये तयार केली असून सध्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे. देशात १०० वर्षांपूर्वीपासून लागू असलेल्या वन कायद्याची नियमावली तयार करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असले तरी तिच्या माध्यमातून आदिवासींच्या मूलभूत अधिकारावरच सरकारने अतिक्रमण केल्याचा आरोप करीत विविध संघटनांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
या नियमावलीतील अनेक तरतुदी ‘पेसा’ आणि वनहक्क कायद्यातील तरतुदींशी विसंगत आहेत. हा उद्योग बांबूप्रेमापोटी झाल्याचे उघड होताच तत्कालीन राज्यपाल के. शंकरनाराणन यांनी थेट वनमंत्री पतंगराव कदम यांना पाचारण करून हे नियम मागे घेण्यास फर्माविले होते. त्यावेळी या नियमात दुरुस्ती होईपर्यंत त्याची अंमलबजावणी स्थगित करण्याची ग्वाही सरकारने दिली. मात्र त्यानंतरही सरकार आपल्या भूमिकेवर अडून बसल्याने शंकरनारायणन यांनी जाता जाता केंद्राला अहवाल पाठवून सरकारचे बांबूप्रेम उघड केले होते.
त्यानंतर केंद्रीय आदिवासी विकास विभागानेही नियमावलीस स्थगिती दिली. मात्र त्यानंतरही राज्य सरकार आपल्या भूमिकेवर कायम असल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांना एक खरमरीत पत्र पाठवून राज्यपाल आणि केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकार करीत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. एवढेच नव्हे तर त्वरित आदेश काढून या नियमावलीची अंमलबजावणी थांबवा, असेही आदेश राज्यपालांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.