पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल मुंबई पोलीस दलातील ९२ पोलीस अधिकाऱ्यांना गुरुवारी राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुवारी राजभवनात झालेल्या एका सोहळ्यात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पदक विजेत्यांमध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, मुंबई रेल्वेचे अतिरीक्त पोलीस महासंचालक भगवंत मोरे, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरीक्त पोलीस महासंचलाक अशोक धिवरे आदींचा समावेश होता. तर ८६ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके प्रदान करण्यात आली.