कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. सनातन संस्थेकडून त्यांच्या आश्रमात येणाऱ्या साधकांना स्क्रिझोफेनिया आणि अन्य मानसिक रोगांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणारी औषधे दिली जात असत, असे एसआयटीने म्हटले आहे. याप्रकरणात अटक करण्यात  आलेल्या दोन आरोपींच्या पत्नींकडून या औषधांबद्दलची माहिती मिळाल्याचे एसआयटीने म्हटले आहे. सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्यावर एसआयटीने काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. याशिवाय, कॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्या जबाबावरून एसआयटीने सनातन संस्थेच्या दोन साधकांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातनकडून साधकांना देण्यात येत असलेल्या औषधांबद्दलचा उल्लेख आहे. एसआयटीकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या पत्नींची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सनातन संस्थेच्या आश्रमात वापरण्यात येणाऱ्या औषधांची तपशिलवार माहिती दिली. साधक जेव्हा आश्रमात वास्तव्याला असत तेव्हा त्यांना ही औषधे दिली जात असत. साधकांना ही औषधे पवित्र असल्याचे सांगितले जाई.

वीरेंद्र तावडे याची पूर्वीची पत्नी निधी तावडे हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात आपल्याला अध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली ही औषधे देण्यात आल्याचे सांगितले आहे. २०१३ ते २०१४ या काळात निधी सनातनच्या पनवेलमधील आश्रमात राहिली होती. त्यावेळी आश्रमातील डॉक्टरांनी स्क्रिझोफेनियाच्या रूग्णांसाठी वापरण्यात येणारी औषधे आपल्याला दिल्याचे निधीने म्हटले आहे. साधकांना पवित्र पाणी असल्याचे सांगून ही औषधे दिली जात असल्याचेही निधीने सांगितले. आश्रमात असताना मला रोज सकाळी आठ वाजता औषध असलेले पाणी प्यायला दिले जात असे. हे पाणी म्हणजे तीर्थ असल्याचे सांगितले जाई. हे पाणी प्यायल्यानंतर मला निराश असल्यासारखे वाटत असे. काही दिवसांनंतर हे तीर्थ म्हणजे मानसिक रोगांसाठी वापरण्यात येणारी औषधे असल्याचे माझ्या लक्षात आले. आश्रमातील ३० ते ३५ साधकांनाही अशाचप्रकारे दररोज औषधे दिली जात असल्याचे निधीने आपल्या जबाबात म्हटले आहे. मी याबद्दल माझा पती वीरेंद्रला विचारले असता त्याने उपचारासाठी ही औषधे दिली जात असल्याचे सांगितले. वीरेंद्रलाही ही औषधे दिली जात असल्याचे निधीने सांगितले. याशिवाय, दुसरा आरोपी असलेल्या विनय पवार याच्या पत्नीनेही गोवा आणि पनवेल आश्रमातील साधकांच्या दिनक्रमाविषयी पोलिसांना माहिती दिली. या आश्रमांममध्ये सकाळी आठ वाजताच्या आरतीने दिवसाची सुरूवात होते. संध्याकाळी सहा वाजता पुन्हा एकदा आरती  केली जाते. यादरम्यान, ११ वाजता सर्व साधकांना प्रसादाचे वाटप केले जाते. याशिवाय, साधक प्रार्थना करतात त्याठिकाणी सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांचे कपडे आणि वस्तू ठेवल्या जातात. या सगळ्यात दैवीकण असल्याचा दावा सनातनकडून केला जातो. २००९ साली गोवा बॉम्बस्फोटाच्यावेळी विनय मला साधनेसाठी बाहेर चाललो असल्याचे सांगून गेला होता. तो तब्बल महिनाभर घरी आला नाही. मात्र, त्याने मला अगोदरच सांगून ठेवल्यामुळे मी पोलिसांकडे तक्रार केली नाही, असे विनय पवारच्या पत्नीने सांगितले.

कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर त्यांच्या घराजवळच १६ फेब्रुवारी २०१५ रोजी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. हल्ल्याच्या चार दिवसांनंतर पानसरे यांचे उपचारादरम्यान मुंबई येथे निधन झाले होते. कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने २ सप्टेंबरला संशयित वीरेंद्र तावडे याला सीबीआयकडून ताब्यात घेतले होते. तावडे याचे कोल्हापूरमधील प्रदीर्घ वास्तव्य, ईमेलवरून झालेला संशयास्पद पत्रव्यवहार, मोबाईलवरील संभाषण आणि साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीने तावडे याला अटक केली होती. या अटकेनंतर तावडे याच्या पनवेल येथील घर आणि सनातन संस्थेच्या आश्रमाचीही झडती घेऊन काही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होणारा तावडे हा समीर गायकवाड याच्यानंतर दुसरा संशयित आरोपी आहे.