एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचे आणलेले र्निबध पायदळी तुडवून दहीहंडीच्या नावाखाली धिंगाणा सुरू असताना काही ठिकाणी गोविंदा पथकांनी नियमांची चौकट न मोडता या र्निबधांना निषेधाचे टोले लगावले. कुठे जमिनीवर आडवे मनोरे जुळवत, तर कुठे शिडीने चढून हंडी फोडत गोविंदांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली.

गिरगावातील बोरभाट लेनमधील जरीमरी गोविंदा पथकाने रस्त्यावर झोपून नऊ थर रचून र्निबधांचा निषेध केला. ‘‘राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात गोविंदा पथकांची बाजू योग्य पद्धतीने मांडली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश कायम केले. उत्सवाची परंपरा आणि गोविंदा पथकांचे म्हणणे योग्य पद्धतीने मांडले असते तर आज ही वेळ आली नसती. त्यामुळे दहीहंडीच्या खाली रस्त्यावर झोपून नऊ थर रचून आम्ही राज्य सरकारचा निषेध केला,’’ असे ‘श्री जरीमरी माता उत्सव समिती गोविंदा पथका’चे माजी सचिव नंदू घोले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

दादरच्या छबिलदास गल्लीजवळ सालाबादप्रमाणे तीन दहीहंडय़ांचे आयोजन करण्यात आले होते. येथे जोगेश्वरीच्या कोकणनगर गोविंदा पथक, हिंदू एकता गोविंदा पथक, अखिल गोविंदा पथक आणि साई चंदन गोविंदा पथकांनी एकत्रितरीत्या चार थर रचत सलामी दिली. या चारही मंडळांनी काळे कापड फडकावत आपला निषेध व्यक्त केला. त्यानंतर हंडी फोडण्यासाठी शैलेश सरदार आणि तपन शहा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या पथकांना भलीमोठी शिडी उपलब्ध करून दिली. या शिडीवर चढून या चारही पथकांच्या प्रशिक्षकांनी हंडी फोडली.

न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नव्हता, पण न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणे आम्हाला योग्य वाटत नव्हते. म्हणूनच निषेधाचा हा प्रकार आम्ही अवलंबला. पुढल्या वर्षीही अधिक उंचीची शिडी लावून सण साजरा करू, असे मंडळाचे कार्यकर्ते शैलेश सरदार यांनी सांगितले. त्यानंतर जोगेश्वरीच्या कोकणनगर गोविंदा पथकाने जमिनीवर झोपून नऊ थरांची सलामी देत निषेध व्यक्त केला.

उंचीची मोजपट्टी

या ठिकाणी एका पथकाने नियमाप्रमाणे चार थरांची दहीहंडी उभारली. मात्र, वरच्या थरावरील गोविंदाने तोंडात मोजपट्टी धरली. ही मोजपट्टी थरांची उंची मोजण्यासाठी होती. मोजपट्टीने थराची उंची मोजण्याच्या या प्रकारामुळे जमावातून टाळ्यांबरोबरच हशाचाही मोठा कल्लोळ उडाला.

चार दुणे आठ

अभ्युदय नगर येथे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या दहीहंडी मंडळाच्या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी आलेल्या ताडवाडी माझगाव या गोविंदा पथकाने चार-चार थरांचे दोन मनोरे शेजारी शेजारी उभारून हाती काळा झेंडा घेत निषेध व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा व युती शासनाचा निषेध करण्यासाठी हे चार थरांचे दोन मनोरे उभारण्यात आले होते.