दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्ये मंगळवारी वीज गायब होण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुंबईत वीजपुरवठा करणाऱया टाटा पॉवर कंपनीचा ५०० मेगावॅटचा वीजसंच मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता बंद पडल्याने मुंबईच्या वेगवेगळ्या भागात भारनियमन करावे लागले. रात्री उशीरापर्यंत वेगवेगळ्या भागात वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. कधीच वीज जात नाही, अशी ख्याती असलेल्या मुंबईमध्येच हा प्रकार घडल्याने राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे.
मेगावाट! टाटाचा वीजसंच बिघडल्याने मुंबईकरांना भारनियमनाचे चटके
राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, सात दिवसांमध्ये अहवाल देण्यास सांगण्यात आले आहेत. सखोल चौकशी करून वीज गायब होण्याला नक्की जबाबदार कोण आहे, हे निश्चित करणे आणि भविष्यात या स्वरुपाचा प्रश्न पुन्हा येऊ नये, यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचविणे, या चौकटीत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली.