पंढरपूरच्या वारीनंतर घाणीच्या साम्राज्यामुळे शहर परिसरात उद्भवणाऱ्या भीषण स्थितीला वारकऱ्यांची बेशिस्तीच जबाबदार असल्याचे नमूद करत पुढील सुनावणीच्या वेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तसेच वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. स्वच्छतागृहे असतानाही वारकरी त्यांचा अजिबात वापर करीत नाहीत. परिणामी शहर परिसरात, नदीकाठी वाळवंटात घाणीचे साम्राज्य पसरते आणि हाताने मैला साफ करणे भाग पडत असल्याचे न्या. अभय ओक आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी झालेल्या सुनावणीत या दोघांनी सादर केलेल्या ५० पानी अहवालातून समोर आले आहे.
या विषयाचे गांभीर्य आणि परिणाम लक्षात घेता लोकप्रभा साप्ताहिकाने ११ जुलै २०१४ च्या अंकात या विषयाचा हात घातला होता. त्यामध्ये वारीमार्गावरील आळंदी ते लोणंद या टप्प्यातील वास्तवाचे भेदक दर्शन, ‘पंढरीच्या वाटेवर प्लॅस्टिकचे साम्राज्य। अन्नाची नासाडी घाणीचे डोंगर।।’ या लेखामध्ये सुहास जोशी यांनी मांडले होते.
तर प्राजक्ता कदम यांनी आपल्या ‘बाजू न्यायाची आणि मानवतेची’ या लेखात ‘कॅम्पेन अगेन्स्ट मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’ या गटाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याच्या संदर्भात सविस्तर लिहिले होते.
विशेष म्हणजे, गुरूवारी ‘एबीपी माझा’ या वृत्तावाहिनीनेही ‘लोकप्रभा’मधील लेखांची दखल घेत ह्या विषयाची लोकांसमोर मांडणी करताना ‘लोकप्रभा’च्या लेखांचा आधार घेतला.