दरवाजात जागा अडवल्याने भावेशचा गाडीत शिरण्याचा प्रयत्न अयशस्वी
‘दरवाजाजवळील प्रचंड गर्दीशी लढत आत शिरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाचा हात अचानक सुटतो आणि धावत्या गाडीतून तो तरुण खाली पडतो..’ भावेश नकातेसह घडलेला प्रसंग दाखवणारी ही चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरत असताना त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकलच्या दरवाजात जागा अडवून घोळक्याने उभ्या राहणाऱ्या टोळक्यांच्या दादागिरीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना नेहमीच बसत असून भावेश नकातेही याच दादागिरीचा बळी नाही ना, अशी शंका आता प्रवाशांमधूनच उपस्थित होत आहे. तसेच या टोळक्यांवर वचक ठेवण्यात लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दल या दोन्ही संस्था अपयशी ठरत आहेत.
भावेश नकातेसह घडलेल्या दुर्दैवी प्रकरणाचे चित्रीकरण याच गाडीतील एका प्रवाशाने केले आणि ते समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखे पसरले. मात्र, चित्रीकरण करणाऱ्या प्रवाशाने नेमका याच वेळी मोबाइलमधील कॅमेरा कसा चालू केला, हा कॅमेरा बरोबर भावेशवरच कसा स्थिरावला आहे, भावेश गाडीत येण्यासाठी धडपडत असताना त्याला जागा कशी देण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न या चित्रीकरणाबरोबरच उपस्थित होत आहेत.याआधीही हाणामारीच्या प्रकरणांनंतर लोहमार्ग पोलिसांनी अशा दादागिरीला आळा घालण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप तसे काहीच घडलेले नाही. आता भावेश नकातेच्या मृत्यूची नोंद केवळ ‘अपमृत्यू’ या सदरात होणार की, त्या प्रकरणातील इतर पैलूंवर पोलीस तपास करणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाबाबत लोहमार्ग पोलीस आयुक्त मधुकर पाण्डे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

लोकलमध्ये ठरावीक वेळेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे गट तयार होतात आणि यापैकी काहीजण दरवाजात उभी राहून दादागिरीही करतात. प्रचंड गर्दी असतानाही दरवाजाच्या एकाच बाजूने चढणे व उतरणे, दरवाजाच्या आसपास त्यांच्या गटाव्यतिरिक्त कोणत्याही प्रवाशाला उभे राहण्यास मज्जाव असतो. यातून अनेकदा भांडणे आणि हाणामाऱ्याही झाल्या आहेत. लोहमार्ग पोलीस वा रेल्वे सुरक्षा दल यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या प्रकरणांची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करूनही काही उपाय झालेले नाहीत.
नंदकुमार देशमुख, अध्यक्ष उपनगरीय प्रवासी एकता महासंघ