तीन अटींवर राहुल गांधी ठाम ; मुंबईतील मेळाव्यात गटबाजी करणाऱ्यांना इशारा

देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) लवकरात लवकर लागू करण्यासाठी सत्ताधारी भाजपचा प्रयत्न असला तरी तीन अटी मान्य झाल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतल्याने या नव्या कर प्रणालीचे भवितव्य अजूनही अंधातरीच आहे. आमच्या मागण्या मान्य करा, तात्काळ विधेयक मंजूर करू, असा पवित्राही काँग्रेसने घेतला आहे.

दोन दिवस मुंबई भेटीवर आलेल्या राहुल गांधी यांनी अनौपचारिक चर्चेत वस्तू व सेवा करावरून काँग्रेसच्या भूमिकेत बदल झालेला नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेस नव्हे तर गांधी घराण्यातील नेत्यांमुळे नवी कर प्रणाली मंजूर होण्यात अडथळा येत असल्याचे सांगत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पक्ष आणि गांधी घराणे यांच्यात गल्लत करण्याचा प्रयत्न होता. तसेच  संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची घेतलेली भेट या पाश्र्वभूमीवर राहुल यांच्या भूमिकेतून ही नवी कर प्रणाली आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर होणार नाही हे अधोरेखित झाले.

करावर १८ टक्क्यांची अट असावी या पक्षाच्या भूमिकेत बदल नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

आघाडीची चर्चा

बिहारमध्ये आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने भविष्यात अन्य राज्यांमध्ये याची पुनरावृत्ती करण्याची राहुल यांची योजना आहे. भविष्यात अन्य राज्यांमध्ये याची पुनरावृत्ती केली जाईल.  सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार समितीवर शरद पवार यांनी टीका केली असली तरी हा प्रयोग (राष्ट्रीय सल्लागार समिती) यशस्वी झाला होता. मनरेगा किंवा अन्य महत्त्वाचे विषय सल्लागार समितीकडूनच आले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पक्षाध्यक्षपद लवकरच?

काँग्रेस पक्षाध्यक्षपद लवकरच स्वीकारणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. तसेच पक्षातील जुन्या नेत्यांच्या विरोधात नाही.

संजय निरुपम यांना अभय

काँग्रेस संदेश या मुखपत्रातील मजकुरावरून निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर निरुपम यांच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यात आली असली तरी राहुल यांनी निरुपम यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना पदावर कायम ठेवले जाईल, असे संकेत दिले.ू

..अन्यथा कारवाई

राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुंबई भेटीत गटबाजी करणाऱ्या नेत्यांचा समाचार घेतला. अंतर्गत भांडणे, लाथाळ्या थांबवा, अन्यथा मलाच पक्षात  शिस्त आणावी लागेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. आगामी मुंबई महापालिका व अन्य निवडणुका एकोप्याने लढा, असा सल्लाही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.  राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या आवारातील सभागृहाचे माजी मंत्री मुरली देवरा सभागृह असे नामकरण करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेसमधील गटबाजीवर नापसंती व्यक्त केली.  मुंबई काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष संजय निरुपम विरुद्ध अन्य नेते असा वाद सुरू आहे.