वस्तू व सेवाकर पंधरा दिवसांत लागू होण्याची शक्यता

जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू झाल्याने खवय्यांना हॉटेलांत खाद्यपदार्थासाठी जादा पैसे मोजावे लागले. त्यापाठोपाठ रेल्वेनेही स्वत:च्या मालकीच्या मोजक्याच रेल्वे स्थानकांतील स्टॉलमधील खाद्यपदार्थावर वस्तू व सेवाकर लागू केला. आता रेल्वे स्थानकांतील खाद्यपदार्थाच्या सर्व स्टॉलवर हा कर लागू करण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाने केलेल्या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने प्रस्तावही तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी १५ दिवसांत करण्यात येणार असून, मध्य रेल्वेकडूनही यावर विचार केला जात आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्टॉलवरील खाद्यपदार्थासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या आणि लोकलच्या प्रथम श्रेणीतील तिकिटावर आधी ४.५ टक्के सेवा कर होता. जुलै २०१७ पासून लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे हाच कर ५ टक्के झाला. त्यामुळे तिकिटाच्या रकमेत थोडीफार वाढ झाली. प्रवाशांच्या खिशाला कात्री लागलेली असतानाच रेल्वेने काही मोजक्याच स्थानकांत असणाऱ्या स्वत:च्या मालकीच्या स्टॉलमधील खाद्यपदार्थावर १२ टक्के जीएसटी लागू केला. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रथम पश्चिम रेल्वेकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेनेही अंमलबजावणी केली. जीएसटीपूर्वी मिळणारे १८ रुपयांचे व्हेज सॅन्डविच हे जीएसटीनंतर २१ रुपये झाले, तर व्हेज बर्गर २८ रुपयांवरून ३२ रुपये आणि अन्य खाद्यपदार्थाच्या किमतीतही दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली. ज्या खाद्यपदार्थावर याआधी सेवा कर होता त्यात जीएसटीचा समावेश केला. त्यामुळे अशा खाद्यपदार्थाच्या किमती वाढल्या नाहीत; परंतु ज्या खाद्यपदार्थावर जीएसटी लागू नव्हता, त्यांच्यावरही हा कर लागू केला. त्यामुळे काही खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ झाली. यानंतर आता रेल्वे बोर्डाकडून जीएसटी लागू करण्यासंदर्भात आणखी काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पश्चिम रेल्वेकडून सर्व स्थानकांतील परवानाधारक स्टॉल्समधील खाद्यपदार्थावर जीएसटी लागू करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ होईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. जीएसटी १२ टक्के लागू करायचा की ५ टक्के यावर मात्र रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. याआधी रेल्वेने स्वत:च्या स्टॉल्समधील खाद्यपदार्थावर १२ टक्के जीएसटी लागू केला होता.

सध्याचे दर

बटाटावडा – ६ रुपये

समोसा – ८ रुपये

१ पाव – २ रुपये (पश्चिम रेल्वेवर)

१ पाव – ३ रुपये (मध्य रेल्वेवर)

रगडा आणि २ पाव – १५ रुपये

साबुदाणा वडा (एक) – ५ रुपये

चहा – ५ रुपये

कोकम सरबत, लिंबू पाणी (२०० मिलि.) – ५ रुपये

पॉपकॉर्न – ५ रुपये

खाद्यपदार्थावर वस्तू व सेवा कर लागू करण्याचा विचार असून, त्याबाबतचा प्रस्ताव आहे. सध्या त्यावर चर्चा सुरू आहे.
– मुकुल जैन (पश्चिम रेल्वे –  विभागीय रेल्वे व्यवस्थापक)