दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या सीमाभागातील शेतकऱ्यांच्या शेतात परराज्यांतून परंपरागत पद्धतीने आणल्या जाणाऱ्या गुराढोरांसाठी यंदा महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्यात येणार आहेत. ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, गुजरातमधून दरवर्षी महाराष्ट्रात येणारी हजारो जनावरे यंदा उत्तर महाराष्ट्रात दिसणार नाहीत.
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात, विशेषत: खानदेशात, दरवर्षी गुजरातेतून हजारो जनावरे महाराष्ट्रात येतात. गुराढोरांचे मलमूत्र आणि शेण हे नैसर्गिक खत असल्याने, शेतात चरण्यासाठी खानदेशातील शेतकरी या गुराढोरांना मुभा देत असतात. त्या मोबदल्यात शेतात नैसर्गिक खत उपलब्ध होत असल्याने वर्षांनुवर्षे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हा व्यवहार सुरू असतो. मात्र, दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर गडद होत असल्याने यंदा या जनावरांना महाराष्ट्रात येऊ दिले जाणार नाही. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचा प्रश्न गंभीर बनला
आहे.
अवकाळी पावसामुळे पाण्याची समस्या काही काळ पुढे रेटली जाणे शक्य आहे. या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्नदेखील काहीसा सुकर झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई एखाद्या भागात भासू लागली, तर वाहतूक करून चारा अन्यत्र नेता
येतो, पण पाण्याचा प्रश्न सोडविणे कठीण असते.
सीमाभागातील संबंधित यंत्रणांना तशा सूचना देण्यात आल्या असून या उपायामुळे चाराटंचाईची तीव्रता काहीशी कमी करणे शक्य होईल, असे खडसे म्हणाले.
खानदेशात दर वर्षी हजारोंच्या संख्येने गुजरातमधील गुरेढोरे महाराष्ट्रात येतात. त्यांच्या खताच्या मोबदल्यात त्यांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न सुटत असल्याने, वर्षांनुवर्षे ही प्रथा सुरू असली तरी यंदा मात्र राज्यातील जनावरांसाठी चारा राखून ठेवणे आवश्यक झाल्याने गुजरातेतील गुराढोरांना महाराष्ट्रात येता येणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.