गुजरातमधील गोध्रा, सुरत तसेच बलसाड येथील दूध संघ महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे दूध संकलन करत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक दूध संघांचे कोटय़वधी रुपयाचे नुकसान होत असल्याचे दिसून आल्यामुळे गुजरातमधील चार बडय़ा दूध संघांना महाराष्ट्रात दूध संकलन करण्यास दुग्ध विकास विभागाच्या सहनिबंधकांनी बंदी घातली आहे.
या दूध संघांना सुनावणीच्यावेळी उपविधी व नोंदणी प्रमाणपत्राच्या प्रती दण्याबाबत तीनवेळा संधी देऊनही त्यांनी त्या हजर केल्या नाहीत, असे सहनिबंधकांनी आपल्या आदेशात मुद्दाम नमूद केले आहे. गुजरात को. ऑप मिल्क मार्केटिंग फेडरेशन आणंद, पंचमहल डिस्ट्रिक्ट को. ऑप मिल्क प्रोडय़ुसर युनियन गोध्रा, सुरत डिस्ट्रिक्ट को-ऑप मिल्क प्रोडय़ुसर युनियन सुरत आणि बलसाड मिल्क प्रोडय़ुसर युनियन बलसाड या गुजरातमधील दूध संघांनी गुजरात शासनाची तसेच महाराष्ट्राच्या दुग्ध विकास विभाग आणि संबंधित यंत्रणांची परवानगी न घेताच महाराष्ट्रातील अनेक भागात मोठय़ा प्रमाणात दूध संकलन केले. याचा फटका बसल्यामुळे गोदावरी खोरे दूध संघ कोपरगाव, संगमनेर तालुका दूध संघ, श्रीगोंदा तालुका दूध संघ, राहाता तालुका दूध संघ, सिन्नर, धुळे आदी तालुका दूध उत्पादक संघांनी गेले वर्षभर या मनमानीविरोधात आवाज उठवला तसेच सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांच्याकडे तक्रारीही केल्या. राज्यातील या दूध संघांना त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राबाहेर दूध संकलन करता येत नाही. त्यातच गुजरातमधील दूध संघांनी मात्र त्यांच्या क्षेत्रात येऊन दूध संकलन करण्यास सुरुवात केल्यामुळे या संघांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होऊ लागले.
याप्रकरणी सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) निलीमा गायकवाड यांनी गुजरातमधील दूध संघांना सुनावणीसाठी जेनावारी व फेब्रुवारी २०१५मध्ये तीनवेळा सुनावणीच्यावेळी त्यांची कागदपत्रे सादर करण्यास सांगूनही त्यांनी कागदपत्रे दिली नाहीत. नाशिकच्या प्रादेशिक दुग्धविकास अधिकाऱ्यांनीही गुजरातमधील दूधसंघ बेकायदेशीरपणे दूध संकलन करत असल्याचा अहवाल दिला असून सुनावणीचे अंतिम कामकाज संपेपर्यंत दूध संकलन करण्यास बंदी केली
आहे.
-संदीप आचार्य