मुंबई पोलीस दलातील बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील ‘प्रिन्स’ या श्वानाचा शुक्रवारी मुंबईत परळ येथे मृत्यू झाला. २००७ मध्ये रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या तपासात तसेच मुंबईतील २६/११च्या हल्ल्यात  काही जिवंत बॉम्ब शोधण्यात ‘प्रिन्स’ने महत्त्वाची कामगिरी बजाविली होती.
वांद्रे येथील हॉटेल सिरॉकमधील आईस्क्रीम मॉलमधील बॉम्ब शोधण्यातही त्याची मोलाची मदत झाली होती. ‘२६/११’च्या हल्ल्यात प्रिन्सने ४ जिवंत बॉम्ब व १७ हात बॉम्ब शोधून काढले होते.  पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक पथकात दहा वर्षे काम केल्यानंतर ३१ ऑगस्ट २०१४ रोजी त्याला सेवेतून निरोप देण्यात आला होता. परळ येथील साखराभाई रुग्णालयात हृदय आणि मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी दुपारी तो मृत्यू पावला.  ‘प्रिन्स’च्या पार्थिवावर परळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
जंजीरची आठवण..   
मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील आणखी एक वलयांकित नाव म्हणजे ‘जंजीर’! १९९३च्या देशातील पहिल्या भीषण मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेत जंजीरने ११ लष्करी, ५७ देशी व १७५ पेट्रोल बॉम्ब आणि ६०० डिटोनेटर्स हुडकून काढली. तसेच ठाणे, मुंब्रा आणि मुंबईतील एक स्फोटही टाळण्यात मदत केली. निवृत्तीनंतर जंजीरला विनोदवीर कपिल शर्माने दत्तक घेतले आहे.