मनासारखे झाले नाही तर वर्गात एखादा मुलगा रुसून बसतो. मग शिक्षिका त्याची समजूत काढतात. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत हे असेच रुसले आहेत. कामतांना रुसणे तसे नवे नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात मनासारखे खाते मिळाले नाही म्हणून रुसून बसले आणि सरळ राजीनामा देऊन घरी परतले. मंत्री करा म्हणून नेतेमंडळींचे पाय धरणारे कमी नसतात. पण पाणीपुरवठा आणि स्वच्छता हे मनासारखे खाते नसल्याने कामत यांनी सरळ मंत्रिपदच झिडकारले. गेल्या वर्षी पक्ष सोडून समाजकरण करण्याचे कामतांनी जाहीर केले. पक्षात गहजब झाला. सोनिया गांधी यांनी चर्चेला पाचारण केले. कामत पुन्हा सक्रिय झाले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कामत पुन्हा रुसले आहेत. कारण म्हणे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची नकारात्मक भूमिका. आता नकारात्मक भूमिका म्हणजे नक्की काय, हे त्यांनी जाहीर केलेले नाही. एक वेळ भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांशी संपर्क होऊ शकतो, पण कामतांशी संपर्क साधणे महाकठीण असते. याचा प्रत्यय काँग्रेसच्या भल्याभल्या नेत्यांना आला आहे. निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे आपण उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अथवा प्रचारापासून अलिप्त राहणार असा संदेश त्यांनी आपल्या समर्थकांना धाडला. म्हणजेच शाळेतील शिक्षिकांप्रमाणे पक्षाच्या नेतृत्वाने आपली समजूत काढावी, असे त्यांना अभिप्रेत असावे. समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्याकरिता हा दबावतंत्राचा भाग तर नाही ना, असा वास काही जणांना आला. काँग्रेसचे नवे युवराज राहुल गांधी हे निरुपम यांना जास्त जवळ करतात, हे कामतांचे आणखी एक दुखणे. आता मुख्य शिक्षिका म्हणजेच पक्षाध्यक्षा सोनियांनी समजूत काढलीच तर कामतांचा रुसवा दूर होईल. पक्ष काय भूमिका घेतो यावरच सारे अवलंबून असेल. बरे,  हा रुसवा दूर केला तरी पुन्हा कामत कधीही रुसून बसतील याची खात्री देता येत नाही. काँग्रेससाठी सारेच अवघड जागेचे दुखणे झाले आहे.