‘नाराज’ गुरुदास कामतांनी भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळली

सुमारे चार दशके एकनिष्ठपणे काम केल्यावर सध्याच्या परिस्थितीत पक्षात कोणत्याही पदावर काम करणे योग्य वाटत नाही. सरचिटणीपदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेस पक्षात कायम राहणार आहे, असे काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग केलेले गुरुदास कामत यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. आपल्या भाजप प्रवेशाबाबत वावडय़ा उठत असल्या तरी काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नाही, असेही त्यांनी सांगितले.

  • काँग्रेसमध्ये नाराज असल्याने पदांचा राजीनामा दिलात का?

सुमारे चार दशके मी पक्षात काम करीत आहे. सध्या मुंबई काँग्रेसमध्ये जो काही सारा गोंधळ सुरू आहे. तेव्हा दूर राहणेच योग्य वाटले.

  • राजीनामा देण्याचा टोकाचा निर्णय का घेतलात ?

पक्षातील सर्व पदांचा राजीनामा मी ३ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाले तेव्हाच सादर केला होता. पण पक्षाने तेव्हा थांबण्याची सूचना केली. आधी मुंबई महानगरपालिका, मग उत्तर प्रदेश निवडणुका, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा परदेश दौरा यामुळे पक्षाने निर्णय घेतला नव्हता. गेल्या बुधवारी मी राहुल गांधी यांची भेट घेऊन पदातून मुक्त करण्याची विनंती केली. त्यांनी पद सोडू नका, असा सल्ला दिला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. चार दशके पक्षात एकनिष्ठ राहूनही अन्य पक्षांतून आलेल्यांना महत्त्व दिले जाते ही बाब माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना खुपते.

  • राजीनामा दिल्यावर काँग्रेसमध्ये कायम राहणार का ?

पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली काम करणार आहे. पण काँग्रेसमध्ये भविष्यात कोणतेही पद स्वीकारणार नाही. अगदी पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये प्रदेश काँग्रेसच्या समितीवर जाणार नाही. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना यापुढे पक्षात माझ्याकडून कोणतीही मदत मिळणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे.

  • भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, याबाबत?

भाजपमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. २०१९ची लोकसभा निवडणूक लढवायची का, याचा निर्णय तेव्हा घेऊ. सध्या तरी समाजकार्य करणार आहे.