गारपीट आणि अवकाळी पावसाने खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी अजून का झालेली नाही, लोकांना पैसे कधी मिळणार, असा हल्लाबोल बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनीच प्रशासनावर केल्याचे समजते.
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे २८ जिल्ह्य़ातील २० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या मानसिक धक्क्याने आतापर्यंत ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गारपीटग्रस्तांसाठी सरकारने चार हजार कोटींचे मदत पॅकेज सरकारने जाहीर करूनही त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी पंचनामे सुरू असून सरकारने दिलेला निधीही तुटपुंजा असल्याच्या तक्रारी काही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत विरोधकांनी या प्रश्नाचे भांडवल करीत सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत ५०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वाटप सुरू असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली. मात्र अतिरिक्त निधीची गरज असून तो मिळत नसल्याची बाबही यावेळी मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणण्यात आली.