मुंबईतील मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वरळी येथील हाजी अली दर्ग्यातील ‘मझार’च्या परिसरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक म्हणावा लागणार आहे. यामुळे हाजी अली दर्ग्यामध्ये आता स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता सर्वांना दर्ग्याच्या मझारपर्यंत प्रवेश मिळणार आहे. डॉ. नूरजहाँ मिर्झा यांनी ट्रस्टच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला.
गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. स्त्री आणि पुरुष या दोघांना समान अधिकार असल्याने बंदी उठविण्याचा निर्णय देत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्य सरकार आणि हाजी अली विश्वस्त समितीने महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, विश्वस्तांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळे निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली आणि निकालाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली.
हाजीअली दर्ग्यात सध्या एका विशिष्ट ठिकाणापर्यंतच महिलांना प्रवेश आहे. मात्र, जिथपर्यंत पुरुषांना प्रवेश आहे, तिथे महिलांनाही प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजीअली दर्ग्यात महिलांना असलेल्या प्रवेशबंदी विरोधात आंदोलनही छेडले होते. तृप्ती देसाई यांच्या हाजीअली दर्ग्यातील प्रवेशावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने शुक्रवारी स्त्री आणि पुरूष या दोघांना समान हक्क देण्याच्या घटनात्मक तरतुदींचा दाखला देत हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देण्याचा निकाल दिला. महिलांना प्रवेशबंदी राज्यघटनेच्या कलम १४, १५ आणि २१ मधील तरतुदींच्या विरोधात आहे. त्यामुळे ती आम्ही रद्द ठरवत असल्याचे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले.
दरम्यान, बंदी उठवली असली, तरी न्यायालायने निकालाला अंतरिम स्थगिती दिली असल्यामुळे महिलांना दर्ग्यात प्रवेश करण्यासाठी आणखी सहा आठवड्यांची वाट पाहावी लागणार आहे.
मुस्लिम महिलांना मक्का, मदिना, नजफ आदी धार्मिक स्थळांवर प्रवेश आहे, मात्र हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना विरोध केला जात आहे. २००१ मध्ये हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश दिला जात होता, मात्र दर्ग्याचे विश्वस्त बदलल्यानंतर महिलांना प्रवेश नाकारला गेला.