‘शालेय पोषण आहार योजने’अंतर्गत विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी म्हणून देण्यात आलेल्या ‘लिक्विड सोप’मुळे अंधेरीतील ‘हंसराज मोरारजी पब्लिक हायस्कूल’मधील विद्यार्थ्यांच्या हाताला खाज आणि चट्टे उठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘पिंकी’ असे नाव असलेला हा साबण राज्यभरात शाळांना वितरित करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्याने या साबणाचा वापर न करण्याच्या सूचना शाळा व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.‘पिंकी मायक्रो केअर सिंडिकेट’ नामक हा साबण महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सौजन्याने वितरित करण्यात आला होता. मुलांना जेवणापूर्वी हात धुण्याची सवय लागावी यासाठी शाळांना ‘शालेय पोषण आहार योजने’अंतर्गत हा साबण देण्यात येणार आहे.राज्यातील इतर भागांप्रमाणे मुंबईतही दक्षिण, उत्तर आणि पश्चिम विभागातील शाळांना हा साबण वितरित करण्यात आला. त्यापैकी पश्चिम भागात गुरुवारी या साबणाचे वाटप शाळांना करण्यात आले.मोरारजी शाळेत पहिल्या सत्रात शाळा भरलेली असताना हा साबण मुलांना हात धुण्यासाठी म्हणून देण्यात आला, परंतु केवळ विद्यार्थ्यांचा म्हणून असलेल्या या साबणाने हात धुताच खाज, चट्टे असा त्रास सुरू झाला. शाळेतील पाचवी ते आठवीच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांना हा त्रास सुरू झाल्याने गोंधळ निर्माण झाला.‘मुलांच्या हाताला खूप खाज सुटल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. चट्टे पडल्याचे दिसल्यावर आम्ही त्यावर बर्फ लावला. तसेच तेल लावून हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला,’ असे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. अंजना प्रकाश यांनी सांगितले. आम्ही तातडीने या साबण्याच्या बाटल्या ताब्यात घेतल्या, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.पश्चिम विभागात या साबणाच्या सुमारे ४,५०० बाटल्यांचे शाळांना वाटप करण्यात आले होते, परंतु मोरारजी शाळेत घडलेल्या प्रकारानंतर आम्ही तातडीने इतर शाळांना सूचना देऊन हा साबण न वापरण्याचे आदेश दिले, असे पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक बी. डी. पुरी यांनी सांगितले.मोरारजी शाळेतील बाटल्या तपासणीकरिता ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आम्ही त्याची तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे पुरी यांनी सांगितले.

चौकशी करणार
राज्यभरात सर्वत्र या साबणाचे वितरण करण्यात आले होते. ते या प्रकारानंतर थांबविण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाचा चौकशी करणार असल्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) महावीर माने यांनी सांगितले.