करूया उद्याची बात
२०१३-आरोग्य
२१ डिसेंबर २०१२.. या दिवशी जगाचा नाश होईल, असे भाकीत मायोन कॅलेंडरने वर्तवले होते. तो दिवस लोटून दहा दिवस लोटले आहेत आणि २०१३ या नव्या वर्षांत अवघे जग पदार्पण करत आहे. कथित जगबुडी संपल्यानंतरही आपण ‘सहीसलामत’ आहोत, ही गोष्ट नक्कीच सुखावह आहे. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या रोजच्या जगण्यात निर्माण केलेल्या प्रकृतीच्या अनेक प्रश्नांना अजूनही उत्तरे सापडलेली नाहीत. या सर्व प्रश्नांना येणारे २०१३ हे वर्ष आणि त्यापुढचा काळ उत्तरे देईल, अशी आशा आहे.

स्वस्ताई औषधांची
गेले वर्षभर गाजत असलेले केंद्र सरकारचे राष्ट्रीय औषध दर धोरण आता अमलात आले आहे. या धोरणामुळे अनेक जीवनरक्षक औषधे स्वस्त होणार आहेत. नव्या धोरणानुसार, भारतीय बाजारपेठेत एक टक्क्यापेक्षा अधिक वाटा असलेल्या सर्व कंपन्यांच्या औषधांचे दर सरासरीच्या आधारे निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे कर्करोगापासून हृदविकारापर्यंतच्या अनेक आजारांवरील औषधांच्या किमती ५० ते ८० टक्क्यांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकारने तयार केलेल्या नव्या धोरणानुसार तब्बल ३४८ औषधांचा जीवनावश्यक औषधांच्या यादीत समावेश होणार आहे. भारतीय औषध बाजारपेठेतील एकूण औषधांमध्ये या औषधांचा वाटा तब्बल ६० टक्के आहे. त्यामुळे नव्या वर्षांत अनेक महागडी औषधे सर्वसामान्यांना स्वस्तात उपलब्ध होतील.

मलेरियाशी लढा देणारे औषध
थेट मेंदुवर आघात करून संपूर्ण शरीरयंत्रणा निकामी करणारा सेलिब्रल मलेरिया हा आजही जीवघेणा आजार ठरत आहे. विशेषत: लहान मुलांसाठी हा अत्यंत धोकादायक आजार आहे. त्यामुळेच या गंभीर आजाराला तोंड देण्यासाठी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ उटाहच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने संशोधन सुरू केले आहे. त्यांच्या मते, शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देण्यात येणारे ‘लोव्हास्टॅटिन’ हे औषध मलेरियाच्या रुग्णाला अन्य औषधांच्या सोबत दिल्यास सेलिब्रल मलेरियाचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. या औषधामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींचा ऱ्हास थांबतो व मेंदुतील रक्तवाहिन्यांतील गळतीही रोखता येते. ही उपचारपद्धती नव्या वर्षांच्या अखेपर्यंत विकसित होण्याची शक्यता आहे.

पुरूषांसाठी ‘गर्भनिरोधक’ गोळय़ा!
‘अनावश्यक’ गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक गोळय़ांची उपयुक्तता आणि त्यांचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम यावरील चर्चा सुरूच असताना आता पुरुषांसाठी ‘गर्भनिरोधक’ गोळय़ा विकसित करण्यात वैदकशास्त्र पुढे सरसावले आहे.
अमेरिकेतील बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन या संस्थेतील संशोधकांनी यासाठी आधीपासूनच हालचाली सुरू केल्या असून पुरुषांसाठी ‘बर्थ कंट्रोल पिल्स’ (प्रजनन नियंत्रक गोळय़ा) तयार करण्यासाठी चाचण्याही घेतल्या आहेत. ‘जेक्यू १’ या नावाने सध्या ओळखल्या जाणाऱ्या या औषधामुळे पुरुषांच्या शरीरातील वीर्यनिर्मितीला आवर घालता येईल, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. अर्थात या औषधाच्या उपयुक्ततेबाबत अमेरिकेतील वैदकजगतातच साशंकता असल्याने प्रत्यक्ष बाजारपेठेत त्यांचे आगमन काहीसे लांबणार आहे.

स्तनांच्या कर्करोगावर नवी उपचारपद्धत
स्त्रियांमध्ये दुसऱ्या सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या स्तनांच्या कर्करोगावर नियंत्रण आणणारी उपचार पद्धती लवकरच विकसित होण्याच्या मार्गावर आहे. फायझर या कंपनीने गेल्या वर्षीच या संशोधनात मोठी मजल गाठली असून या उपचारामुळे स्तनांतील कर्करोगाच्या गाठींची वाढ दिर्घकाळापर्यंत रोखता येऊ शकते. ‘पीडी ०३३२९९१’ असे नाव असलेले हे औषध या कर्करोगावरील अन्य औषधाबरोबर दिल्यास किमान दोन वर्षे कर्करोगाच्या गाठींची वाढ रोखता येते, असा दावा कंपनीने केला आहे. याबाबत येत्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर चाचण्या घेण्यात येतील व साधारणपणे वर्षांच्या मध्यापर्यंत ही उपचारपद्धती बाजारात उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

मोबाइल उपचार
जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनलेला मोबाइल केवळ संभाषणापुरता वापरण्याचा काळ कधीच मागे पडला आहे. हाच ट्रेंड आता आरोग्यक्षेत्रातही रूजू पहात आहे. फिटनेसशी संबंधित टिप्स, वजन कमी-अधिक करण्यासाठीचा आहार किंवा विविध आजारांमध्ये घ्यावयाची काळजी या सर्वाशी संबंधित अॅप्लिकेशन्स मोबाइलवर सर्रास उपलब्ध आहेत. याच गतीने आता अनेक डॉक्टर आणि मोठमोठी रुग्णालये मोबाइलच्या माध्यमातून आपल्या रुग्णांना ‘अपडेट’ ठेवण्याची यंत्रणा विकसित करत आहेत. याशिवाय डॉक्टर रुग्णालयात असो वा प्रवासात रुग्णाची सर्व वैद्यकीय पाश्र्वभूमी त्यांना मोबाइलवर पोहोचवण्याची व्यवस्था करणारी अॅप्लिकेशन्सही बाजारात उपलब्ध होणार आहेत.