जुनाट गाडय़ा, न वाढणारी डब्यांची संख्या, अपुऱ्या फेऱ्या या सगळ्यांमुळे पिचलेल्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना आता डीसी-एसी परिवर्तनानंतर आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे. परिवर्तनानंतर लागू होणाऱ्या नव्या वेळापत्रकात हार्बर मार्गावर १२ फेऱ्या वाढणार असल्या, तरी यापुढील प्रत्येक मेगाब्लॉकच्या दिवशी या मार्गावरील प्रवाशांना ‘मेगाहाल’ सहन करावे लागणार आहेत. सध्या मेगाब्लॉकदरम्यान अनेकदा हार्बर मार्गावरील वाहतूक कुर्ला ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यांदरम्यान मुख्य मार्गावरून चालवली जाते. मात्र परिवर्तनानंतर हार्बर मार्गावरील डीसी विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या गाडय़ा मुख्य मार्गावर चालणे शक्य होणार नाही. परिणामी या प्रवाशांच्या कटकटीत भर पडणार आहे.
मध्य तसेच हार्बर मार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असेल, तर या दरम्यानची वाहतूक मुख्य मार्गावरून चालवली जाते. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे गाडय़ा बदलण्याचे कष्ट वाचतात. सध्या हार्बर तसेच मुख्य मार्गावर या दोन्ही स्थानकांदरम्यान डीसी विद्युतप्रवाह असल्याने गाडय़ांचा हा मार्गबदल शक्य होत आहे.
मात्र, येत्या आठवडय़ात मुख्य मार्गावर सीएसटी ते ठाणे यादरम्यान डीसी-एसी परिवर्तन होणार आहे. त्यानंतर मुख्य मार्गावर फक्त एसी विद्युतप्रवाहावरील गाडय़ा धावणेच शक्य होईल. पण हार्बर मार्गावर डीसी विद्युतप्रवाह कार्यान्वित आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्वच गाडय़ा डीसी विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या आहेत. परिणामी या मार्गावरील गाडय़ा आता मुंबईतीलच नाही, तर देशातील कोणत्याही भागात चालणार नाहीत, असे मध्य रेल्वेच्या परिचालन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आता हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेतला, तर या मार्गावरील वाहतूक बंद राहीलच. पण ही वाहतूक मुख्य मार्गावरही वळणार नाही. परिणामी प्रवाशांना कुर्ला स्थानकात उतरून मुख्य मार्गावरील गाडय़ांमधून प्रवास करावा लागेल. त्यामुळे आता मुख्य मार्गावरील प्रवाशांनाही रविवारच्या दिवशी प्रचंड गर्दीचा सामना करावा लागणार आहे.