काही महिन्यांपर्यंत आपल्या वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेली हार्बर मार्गावरील वाहतूक गेल्या काही महिन्यांत ढेपाळली आहे. यासाठी तांत्रिक बिघाडांबरोबरच बॉम्बे पोर्ट ट्रस्टमधून हार्बर मार्गाला जोडली गेलेली मालगाडीची मार्गिका, हे प्रमुख कारण आहे. या कारणाचा समूळ निपटारा करण्यासाठी मालगाडय़ांच्या वाहतुकीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या व रेल्वेच्या जागेतून स्वतंत्र मार्गिका बांधण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाकडे पंतप्रधानांच्या कार्यालयाचे लक्ष असूनही या जागांवर असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे हा प्रकल्प रखडला आहे.
विशेष म्हणजे एमएमआरडीएने या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी डिसेंबर २०१४ची मुदतही देण्यात आली होती. पण नोव्हेंबर उलटत आला, तरी प्रकल्पग्रस्तांच्या झोपडय़ा या जागेवरच असल्याचे समोर येत आहे.हार्बर मार्गावरील गाडय़ांचे वेळापत्रक बिघडण्यामागे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतून येणाऱ्या आणि उपनगरीय वाहतुकीसाठी मार्ग अडवणाऱ्या मालगाडय़ा कारणीभूत आहेत. अनेकदा वडाळ्याच्या रावली येथील क्रॉसिंगवर या मालगाडय़ा बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वडाळा ते कुर्ला या दरम्यान मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि रेल्वे यांच्या हद्दीतून एक स्वतंत्र मार्गिका या मालगाडय़ांसाठी टाकण्याचा प्रस्ताव आहे. १७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर खास पंतप्रधानांच्या कार्यालयाचीही नजर आहे. मात्र हा प्रकल्प पूर्णत्त्वास नेताना १६८० प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.नवीन मार्गिका टाकण्याच्या ठिकाणी अनेक बेकायदेशीर बांधकामे असून त्यांना हटवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय हा प्रकल्प मार्गी लागणार नाही. या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे एमएमआरडीएकडे सोपवली आहे. काम पूर्ण करण्यासाठी  डिसेंबपर्यंतची मुदत दिली होती.