मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-ठाणे या टप्प्यातील डीसी-एसी परिवर्तनाचे काम पूर्ण झाल्यानंतर हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची आशा ‘भंगारा’त निघाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या डीसी विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या गाडय़ांचे आयुर्मान उलटूनही त्या नाईलाजाने चालविल्या जात आहेत. डीसी-एसी परिवर्तनानंतर या गाडय़ा भंगारात निघणार असून यापैकी एकही गाडी हार्बर वा ट्रान्स हार्बर मार्गावर वळवण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले.
डीसी-एसी परिवर्तनानंतर डीसी विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या ९ गाडय़ा (म्हणजे १०८ डबे) मुख्य मार्गावरून सेवामुक्त होणार होत्या. त्यातील दोन गाडय़ा हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर वळवण्याची योजना विचाराधीन होती. मात्र सध्या डीसी विद्युतप्रवाहावरील तब्बल ३४५ डब्यांचे आयुर्मान उलटले आहे. त्यामुळे या सर्व डब्यांची तपासणी करून सर्वात जुने झालेले १०० डबे भंगारात काढले जातील, असे ब्रिगेडिअर सूद यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हार्बर व ट्रान्स हार्बरच्या फेऱ्या वाढण्याची शक्यता दुरावली आहे. हार्बर मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाचे कामही प्राधान्याने केले जाणार आहे. मात्र सेवेसाठी पुरेसेडबे उपलब्ध नाहीत, अशी कबुलीही ब्रिगेडिअर सूद यांनी दिली.