गोरेगावपुढे हार्बर मार्गाचा विस्तार नाही; वांद्रे-विरार उन्नत मार्गाचे कारण देत प्रकल्प बासनात

बोरिवलीहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी हार्बर मार्गाद्वारे सातत्याने गाडय़ा चालवण्यासाठी आवश्यक असा हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंतचा विस्तार आता खुंटला आहे. सध्या अंधेरी ते गोरेगाव यांदरम्यान हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम जोरात चालू आहे. पण लवकरच वांद्रे-विरार हा उन्नत रेल्वेमार्ग अस्तित्त्वात येणार असल्याने हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्याची गरज उरणार नाही, असे कारण देत हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा प्रकल्प गुंडाळण्यात आला आहे.

एमयुटीपी-२ या योजनेत अंधेरी ते गोरेगाव यांदरम्यान हार्बर मार्गाचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाचा समावेश होता. त्याप्रमाणे या प्रकल्पाचे काम जोरात सुरू असून हा प्रकल्प मार्च २०१७मध्ये पूर्ण होण्याची शक्यताही मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना बोरिवली ते सीएसटी थेट प्रवासाची स्वप्ने दाखवत या मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्याचा प्रस्ताव वर्षांनुवर्षे मांडला जात आहे. रेल्वेनेही हा प्रस्ताव गांभीर्याने घेत त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले होते. हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले होते.

आता वांद्रे-विरार यांदरम्यान उन्नत रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून हा प्रकल्प निती आयोगाच्या मान्यतेसाठी गेला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पश्चिम रेल्वेवरील बहुतांश सेवा या मार्गावरून जातील. परिणामी हार्बर मार्गावरील काही सेवा पश्चिम रेल्वेवरील सध्याच्या मार्गावरून चालवता येतील. त्यामुळे गोरेगाव ते बोरिवली यांदरम्यान वेगळ्या मार्गासाठी खर्च करण्याची गरज नसल्याचे एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. त्यामुळे आता हा प्रकल्प पुन्हा एकदा गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे.