पश्चिम रेल्वेवरील बोरिवली आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेले मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही दोन स्थानके जोडणाऱ्या हार्बर मार्गाच्या बोरिवलीपर्यंतच्या विस्ताराचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंतचा विस्तारही लांबणीवर पडला आहे. सध्या अंधेरीपर्यंत स्वतंत्र मार्गिकेवरून धावणारी हार्बर रेल्वे गोरेगावपर्यंत नेण्यात जोगेश्वरी स्थानकाजवळील जमीन हस्तांतरणाचा अडथळा आहे. तसेच जोगेश्वरी आणि गोरेगाव यांदरम्यान नव्याने बांधलेल्या ओशिवरा स्थानकाचे काम या स्थानकाजवळील प्रस्तावित उड्डाणपूल तयार झाल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे किमान पुढील वर्षभर तरी हार्बर मार्गावर ‘गोरेगाव लोकल’ धावण्याची चिन्हे नाहीत.
मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेला हार्बर मार्ग सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरीपर्यंत आहे. सध्या हार्बर मार्गावर अंधेरीपर्यंत नियमित गाडय़ा धावतात. मात्र मूळ एमयुटीपी-३ योजनेमधील प्रकल्पानुसार हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्याची योजना होती. ही योजना मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने अव्यवहार्य ठरवत हार्बर मार्गाचा विस्तार गोरेगावपर्यंतच करण्यासाठी काम सुरू केले आहे. मात्र या कामात जोगेश्वरी येथील एका जमिनीच्या तुकडय़ाचा अडथळा आला आहे. जोगेश्वरी स्थानकाला लागून असलेल्या या जमिनीवर एक हॉटेल असून त्या हॉटेलचे स्थलांतर झाल्याशिवाय हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाची गाडी जोगेश्वरीपुढे सरकू शकणार नाही, असे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
तसेच या मार्गावर नवीन ओशिवरा स्थानकही प्रस्तावित आहे. या स्थानकाची उभारणी जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र या स्थानकातील प्लॅटफॉर्म पूर्ण करण्यासाठी येथे असलेले रेल्वे फाटक बंद करण्याची गरज आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंना जोडणारा उड्डाणपूल आवश्यक आहे. या उड्डाणपुलाचे काम पालिकेमुळे रखडल्याचा दावा रेल्वे करत आहे. हा पूल बांधल्यानंतरच्या  सहा महिन्यांत ओशिवरा स्थानकातील काम पूर्ण होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
या सर्वासाठी किमान एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. ओशिवरा स्थानकाचा विचार न करता हे स्थानक कार्यान्वित होण्यापूर्वी हार्बर मार्ग सुरू करण्याचे ठरवले, तरी त्यात अडचणी येणार आहे. सध्या केवळ पश्चिम रेल्वेच्या गाडय़ांसाठी उघडबंद होणारे रेल्वे फाटक हार्बर मार्गावरील गाडय़ांसाठीही उघडबंद करावे लागेल. परिणामी ओशिवरा स्थानकाचे व पर्यायाने उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यावरच हार्बर मार्गावरील गाडय़ा गोरेगावपर्यंत धावणे शक्य होईल, असे हा अधिकारी म्हणाला.