मालगाडी घसरल्यामुळे विस्कळीत झालेली हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. तब्बल पाच तासांच्या खोळंब्यानंतर सीएसटी- पनवेल मार्गावरून पहिली लोकल मार्गस्थ झाली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी गुरू तेगबहाद्दूर नगर डाऊन मार्गावर मालगाडीचे शेवटचे चार डब्बे घसरले. त्यामुळे पहाटेपासून हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे सध्या वडाळा ते कुर्ला या स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन या दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे हार्बर रेल्वेच्या डाऊन दिशेकडून येणाऱ्या गाड्या कुर्ला स्थानकापर्यंतच चालवण्यात येत होत्या. दरम्यान, हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना सीएसटीपर्यंत जाण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, एकुणच या गोंधळामुळे सकाळच्या वेळेत प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर गैरसौय झाली. कालच रेल्वे मार्गावरील रूळ, स्लीपर्स, ओव्हरहेड वायर, सिग्नलिंग यंत्रणा आदींच्या देखभाल-दुरुस्तीच्या महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, आज पहिल्याच दिवशी गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.