एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे यांचे वडील हरिश्चंद्र आंग्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
काळाचौकी पोलीस ठाण्यात आंग्रे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. विकासकाच्या मदतीने एक गाळा हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
 चिंचपोकळी येथील शिरीन मंझिल या इमारतीमधील एक गाळा दिलीप चव्हाण यांनी २०१० मध्ये २५ लाख रुपयांना विकत घेतला होता. या इमारतीचे पुनर्वसन नवीन जैन, प्रवीण जैन हे विकासक करणार होते.
मात्र विकासक आणि हरिश्चंद्र आंग्रे यांनी संगनमत करून ही जागा आंग्रे यांच्या नावावर करून टाकली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
पोलीस टाळाटाळ करत असल्याने चव्हाण यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली. मारिया यांनी आदेश दिल्यानंतर काळाचौकी पोलिसांनी सप्टेंबर २०१४ मध्ये विकासक नवीन जैन, प्रवीण जैन आणि हरिश्चंद्र आंग्रे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
आंग्रे यांनी याविरोधात न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो नुकताच न्यायालयाने फेटाळला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, अशी माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर तावडे यांनी दिली. एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे यांचे वडील असल्याने पोलीस हरिश्चंद्र आंग्रे यांना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
  या गाळ्याबाबत श्रीधर लाड आणि हरिश्चंद्र आंग्रे यांच्यात वाद होता. न्यायालयातील प्रकरण आंग्रे हरले होते. चव्हाण यांनी आंग्रे यांना १७ लाख आणि लाड यांच्या मुलांना ७ लाख रुपये देऊन हा गाळा विकत घेतला होता.