हॅरी पॉटरनऊ वर्षांनंतर वाचकांच्या भेटीला; ई-बुक स्वरूपातही उपलब्ध

लंडनच्या ‘पावणेदहा’ या चक्रम क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर नऊ वर्षांपूर्वी बंद झालेल्या ‘हॉगवर्ट्स’च्या जादूई दुनियेचे दार ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड दि कर्स चाइल्ड’ या जे. के. रोलिंग लिखित पुस्तकाच्या रूपाने रविवारी पुन्हा उघडणार आहे.

तब्बल २० वर्षांपूर्वी म्हणजे १९९७ साली ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड दी फिलॉसॉफर्स स्टोन’ या पुस्तकाच्या रूपाने हॉगवर्ट्सची जादूई दुनिया वाचकांकरिता खुली झाली होती. २००७ साली पुस्तकाच्या लेखिका रोलिंग यांनी ‘डेथली हॉलोज’ हा सातवा भाग प्रकाशित करीत ‘हॅरी पॉटर’ मालिकेला अल्पविराम दिला. मूळ इंग्रजी, पण जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ३१ जुलैपासून ‘हॅरी पॉटर’चा नवा भाग बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून हे पुस्तक ‘ई-बुक’ स्वरूपातही मिळणार आहे.

‘डेथली हॉलोज’च्या शेवटच्या पानावर आपल्या मुलांना हॉगवर्ट्सच्या वाटेला लावून देण्यासाठी हॅरी पत्नी जिनीसोबत त्याच चक्रम प्लॅटफॉर्मवर येतो आणि मुलांसोबत वाचकांचाही निरोप घेतो. परंतु आता हॅरी ‘अ‍ॅण्ड द कस्र्ड चाइल्ड’ या आठव्या पुस्तकाच्या रूपाने आपली घनिष्ट आणि हुशार मैत्रीण हरमायनी आणि साधाभोळा मित्र रॉन यांच्यासमवेत पुन्हा एकदा हॉगवर्ट्सच्या जादूई दुनियेचे गारूड घालण्याकरिता येणार आहे. ‘हॅरी पॉटर’चे आत्तापर्यंत सात भाग प्रकाशित झाले आहेत. त्यानंतर या मालिकेला निरोप देत असल्याचे रोलिंग यांनी जाहीर केले होते. मधल्या काळात त्यांनी टोपणनावाने रहस्यमय कादंबऱ्या लिहिल्या; परंतु त्यांचे फारसे स्वागत वाचकांकडून झाले नाही. रविवारी बाजारात दाखल होणारा हा आठवा भाग आहे. शेवटचा भाग २००७ मध्ये प्रकाशित झाला होता.

ऑनलाइन विक्री..

  • ‘फ्लिपकार्ट’, ‘अ‍ॅमेझॉन’ आदी संकेतस्थळांवर हॅरी पॉटरच्या नव्या पुस्तकाची ऑनलाइन विक्री सुरू आहे.
  • मूळ ८९९ रुपये किमतीचे हे पुस्तक ‘फ्लिपकार्ट’वर ६७४ रुपयांत उपलब्ध आहे. आगाऊ नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य.
  • मुंबईतील ‘क्रॉसवर्ड’ आणि अन्य मोठय़ा पुस्तकांच्या दुकानांत या नव्या भागाची वाचकांनी आगाऊ नोंदणी केली आहे. त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
  • पुस्तकाच्या प्रती उपलब्ध असतील तर ज्यांनी नोंदणी केलेली नाही, अशांना हे पुस्तक मिळणार आहे. पण तशी शक्यता तूर्तास खूप कमी आहे.
  • यापूर्वीही नोंदणी न केलेल्या लोकांना पुस्तक न मिळाल्याने निराश होऊन परतावे लागले होते.