मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी मुंबई महानगरपालिकेला खडेबोल सुनावले.
मनात आणले तर मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे एका दिवसात बुजवता येतील, मात्र ही इच्छाशक्ती कोणाकडे दिसत नाही. मुंबईकर सर्व गोष्टी सहन करतात ही शोकांतिका असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले. पावसाळ्यात दरवर्षी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात आणि पाणी साचल्याने वाहतुकीच्या अडचणींना मुंबईकरांना सामोरे जावे लागते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याच्या बातम्याही येतात. मग रस्त्यावरील खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी देखील केली जाते. पण कायमस्वरूपी तोडगा काढण्याची इच्छाशक्ती प्रशासनाची दिसत नाही, असेही कोर्टाने नमूद केले आहे.