एक तरुण. त्याची दोस्ताच्याच मेव्हणीशी प्यारवाली लव्हस्टोरी.. दोस्ताचा त्यात मोडता आणि अखेर? त्या दोस्ताचा खून.. तोही पचला. पोलिसांना पत्ता नाही, घरच्यांना पत्ता नाही. आता प्रेमाची गाडी सुसाट धावायला हरकत नव्हती, पण.. प्रेमाच्या स्वप्नांची जागा मयताच्या स्वप्नांनी घेतली. एवढच नाही, स्वप्नात येऊन तो धमकवायलाही लागला.. दररोजच्या या भयानक स्वप्नांनी खचलेल्या या तरुणाने अखेर पोलीस ठाणे गाठून हत्येची माहिती आणि कबुलीही दिली.. चित्रपटातही खोटा वाटेल असा हा प्रसंग मालाडच्या कुरार गावात घडलेला!
मकबूल हसन सरदार अली (३०) हा मालाडच्या कुरार गावात राहतो. कपडे शिवण्याचा त्याचा व्यवसाय होता. अहमदाबाद येथील समव्यावसायिक सादिक अली रसूल अली चारमियाँ (३०) हा त्याचा मित्र. सादिकची सासुरवाडी गोवंडी येथे होती. त्यामुळे गोवंडीला तो अनेकदा यायचा. मकबूलचे आपल्याच मेहुणीशी प्रेमसंबध असल्याचे सादिकला समजले. तेव्हा तो भडकला आणि त्याने या प्रेमसंबंधला विरोध केला. त्यामुळे मकबूलने सादिकचा काटा काढण्याचे ठरवले. ऑगस्टमध्ये सादिक गोवंडीला आला होता. मकबूलने त्याला भेटीच्या निमित्ताने मालाडला बोलावले आणि त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह त्याने ओबेरॉय मॉलसमोरच्या नाल्यात टाकून दिला. सादिक घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार गोवंडी पोलीस ठाण्यात दिली होती.
कसलाच पुरावा न ठेवता मकबूलने ही हत्या पचवली खरी पण त्याला एक विचित्र त्रास सुरू झाला. मयत सादिक दररोज त्याच्या स्वप्नात येऊ लागला. ‘‘तू माझा खून केलायस.. मी तुला सोडणार नाही..’’ अशा धमक्या या स्वप्नात सादिक देताना दिसू लागताच मकबूलची झोप उडाली. दिवसेंदिवस तो बेचैन झाला. त्याच्याकडे एकच पर्याय उरला. तो मालाडमधील कुरार पोलीस ठाण्यात गेला. ‘‘साहेब, मी चार महिन्यांपूर्वी माझ्या मित्राचा खून केलाय. मला अटक करा..’’ त्याच्या या कबुलीने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे सादिकचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. अर्थात, मकबूलचा कबुलीजबाब खरा मानून त्याला अटक करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयचंद्र काथे यांनी सांगितले.