पहाटेचा अंधार.. बॉम्बे हॉस्पिटलजवळचा दर्गा.. पदपथावर नेहमीप्रमाणे काही जण झोपले होते. त्याचवेळी एक आलिशान गाडी येऊन तिथे थांबली. या गाडीतून एका दाम्पत्याने एका वृद्धेला घाईघाईने खाली फेकले आणि लगेच गाडी सुसाट वेगाने निघून गेली. खंगलेल्या आणि मरणासन्न अवस्थेतील त्या वृद्धेला काय होतेय तेच समजले नाही. ‘बाळा, हे काय करतोयस, मला इथे का सोडून चाललायस.. मला घरी घेऊन चल..’ अशा शब्दात तिने टाहो फोडला. पण तो ऐकायला तिचा मुलगा थांबला नव्हता. कोसळणाऱ्या पावसात ती वृद्ध महिला तशीच कुडकुडत राहिली. पदपथावरील भिक्षेकरी निर्जीव डोळ्यांनी ते करुण दृश्य बघत होते..

मुलगा आज ना उद्या घ्यायला येईल या आशेत ही वृद्धा सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय. १५ दिवसांपूर्वी बॉम्बे हॉस्पिटलसमोर हा हृदयद्रावक प्रसंग घडला. कुठून तरी गाडीतून आलेल्या त्या मुलाने आपल्या खंगलेल्या आईला टाकून निघून गेला होता. त्याच वेळी तेथून जाणारे एक आयुर्वेदिक डॉक्टर निरंजन पटेल यांना ती वृद्धा रस्त्यात पडलेली दिसली. त्यांनी तिला रेनकोट दिला आणि खाण्यास दिले. त्यामुळे वृद्धेला थोडी तरतरी आली. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून त्यांच्या मदतीने त्या वृद्धेला जीटी रुग्णालयात दाखल केले. या वृद्धेचे नाव हंसा राजपूत असून त्यांचे वय ८५ आहे. त्यांची स्मृती क्षीण झाल्याने त्यांना फार काही सांगता येत नाही.

माझ्या मुलाचे नाव दिलीप असून तो गणेश गल्लीत राहतो, एवढेच त्या सांगू शकल्या, असे डॉ. पटेल म्हणाले. वाढते वय, त्यात आजारामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. गेला आठवडाभर त्या अंथरुणाला खिळून आहेत. डॉ. पटेल दररोज रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस करतात.

डॉ. पटेल यांनी हंसा राजपूत यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांची अवस्था वाईट होती. कुपोषणामुळे त्या खंगल्या होत्या. आता त्या अंथरुणाला खिळल्या आहेत. बेवारस असल्याने त्यांची देखभालही नीट होत नाही. त्यामुळे त्यांची स्थिती गंभीर झाली आहे. त्यांना राजस्थानी भाषा समजते. परंतु त्यांना काही आठवत नाही, असे डॉ. पटेल यांनी सांगितले. तिला कुठल्या स्वयंसेवी संस्थेने मदत केली तरच त्यांचे शेवटचे थोडेफार दिवस सुखात जातील,, असेही ते म्हणाले. आपल्या वृद्ध आईला रस्त्यावर टाकून गेला तेव्हा त्या मुलाला कुणी अडवलेही नाही. अशा मुलाला शोधून शिक्षा करायला हवी, अशी मागणी डॉ. पटेल यांनी केली.  पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांना ही माहिती देण्यात आली. या वृद्धेच्या मुलाला शोधून काढण्याचे प्रयत्न संबंधित पोलीस ठाण्याला सांगून केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.