हेडलीच्या जबाबाने हल्ल्यामागे पाकिस्तान असल्यावर शिक्कामोर्तब
मुंबईवरील हल्ला करणाऱ्या दहा दहशतवाद्यांनी त्यापूर्वीही दोनवेळा मुंबईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि दोन्ही प्रयत्न फसले होते, असा जबाब लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक डेव्हीड कोलमन हेडली याने सोमवारी मुंबई येथील विशेष न्यायालयासमोर दिला. पाकिस्तानातील आयएसआयने लष्कर-ए-तोयबाच्या साथीने या हल्ल्याचा कट रचल्याचा दावा करून हेडलीने २६/११च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले. हेडलीने या वेळेस हल्ला रचणाऱ्या आयएसआय आणि लष्करच्या अधिकाऱ्यांची नावेही न्यायालयासमोर उघड केली.
मुंबई हल्ल्याप्रकरणीच शिकागो कारागृहात ३५ वर्षांची शिक्षा भोगत असलेला हेडलीला मुंबईतील खटल्यात माफीचा साक्षीदार बनविण्यात आलेले आहे. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ‘व्हिडिओ कॉन्फरन्स्िंाग’द्वारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांच्यासमोर त्याचा जबाब नोंदवण्यास सुरूवात केली. एखाद्या आरोपीची तीही दहशतवाद्याची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स्िंाग’द्वारे साक्ष नोंदविण्याची ही भारतीय न्यायव्यवस्थेतील ही पहिलीच घटना आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ‘व्हिडिओ कॉन्फरन्स्िंाग’द्वारे अमेरिकेतील कारागृहातून हेडलीचा जबाब नोंदविण्यास सुरूवात झाली. त्या वेळेस त्याच्यासोबत त्याचे वकील जॉन, अमेरिकी न्यायालयाच्या अ‍ॅटर्नी जनरल सारा आणि शिकागो न्यायालयाचे कारकून बॉब असे तिघेजण उपस्थित होते. त्याचे कायदेशीर सल्लागार म्हणून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी हे मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणीच्या वेळेस उपस्थित होते.
सोमवारच्या सुनावणीत हेडलीने लष्कर आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे २६/११च्या हल्ल्याचा कट रचला हे सांगताना पाकिस्तानातील मुजफ्फराबाद येथे दहशतवाद्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आल्याची तपशीलवार माहिती न्यायालयाला दिली. त्या वेळेस त्याने २६/११च्या हल्ल्यापूर्वी दोनवेळा मुंबईवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि दोन्ही प्रयत्न फसल्याचा खुलासा केला.

हाफीज सईदचा प्रभाव
लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) संपर्कात तो कसा व कुणाच्या माध्यमातून आला याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हेडलीकडे विचारणा केली. त्या वेळेस हाफीज सईदच्या भाषणांनी प्रभावित होऊन एलईटीचा कट्टर समर्थक बनल्याचा आणि ‘एलईटी’ आणि ‘आयएसआय’ पाकिस्तानातील कारवायांचा खुलासा हेडलीने केला.

इच्छा लख्वीमुळे अपूर्ण!
मी मुझफ्फराबाद येथे दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर काश्मीरमधील भारतीय सैन्याशी लढण्याची प्रचंड इच्छा होती. मात्र आपल्यासाठी त्याहूनही मोठी जबाबदारी राखून ठेवल्याचे सांगत झकी उर रहमान लख्वीने साजिद मीरच्या माध्यमातून कळवले. त्यामुळे ही इच्छा अपूर्ण राहिली. हल्ल्यापूर्वी सात वेळा तर हल्ल्यानंतर एकदा भारत दौरा केल्याचीही कबुली दिली.

हल्ल्याच्या कटातील सूत्रधार
पाकिस्तानमधील साजिद मीरसह मेजर इक्बाल, निवृत्त मेजर अब्दुल रहमान पाशा या अफगाणिस्तान नजीकच्या फाटा प्रांतातील आयएसआयच्या म्होरक्यांच्या संपर्कात आलो. तर लष्करच्या मुझम्मिल बट, अबू फुरकार, सनाउल्ला, अबू हंजाला, अबू उस्मान, अबू सैफ आणि अबू फहादुल्ला यांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिल्याचेही त्याने सांगितले. यातील काहीजणांना लिहिता वाचताही येत नव्हते.