मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; भामला फाऊंडेशनच्या ‘आरोग्य जीवनशैली’ ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन

अति ताणतणाव आणि मधुमेह हे हळूहळू बळावत जाणारे व आपल्या आरोग्यास घातक असे ‘छुपे मारेकरी’ आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यांचा विळखा आपल्या शरीराभोवती पडतो. त्यामुळे ‘मला काही होणार नाही’ अशा बेफिकीर वृत्तीत न राहता प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत वरळी येथे केले.

बृहन्मुंबई महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भामला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘आरोग्य जीवनशैली’ या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन आणि आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अभिनेता अक्षयकुमार, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, भारतीय जनता पक्षाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष व आमदार अ‍ॅड्. आशीष शेलार, डॉ. रमाकांत पांडा, अजिंक्य पाटील आणि फाऊंडेशनचे आसिफ भामला आदी मान्यवर उपस्थित होते.

बदलती जीवनशैली आणि खाद्यसंस्कृती याचाही परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत कोणताही हलगर्जीपणा न करता जागरूक राहावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भामला फाऊंडेशनने महापालिकेच्या सहकार्याने आरोग्याबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून खूप चांगले काम केले आहे. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होणारच नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यावी.

एखाद्या अभिनेत्याने किती चित्रपटांत काम केले, त्याचे किती चित्रपट गाजले याला माझ्या दृष्टीने महत्त्व नाही. तर त्या अभिनेत्याची समाजासाठी किती बांधिलकी आहे, तो आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडतो का ते खूप महत्त्वाचे आहे आणि ते कर्तव्य पार पाडणारा अभिनेताच खरा ‘सुपरस्टार’ असतो. अभिनेता अक्षयकुमार याने वेळोवेळी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली असल्याने तो खरा ‘सुपरस्टार’ आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी अक्षयकुमारचे कौतुक केले.

या वेळी अ‍ॅड्. आशीष शेलार, अजय मेहता, डॉ. रमाकांत पांडा आणि अक्षयकुमार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आसिफ भामला यांनी फाऊंडेशनच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली. या ध्वनिचित्रफितीसाठी तसेच जनजागृती मोहिमेसाठी सहकार्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ‘द इंडियन एक्स्प्रेस (पी) लिमिटेड’च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष विवेक गोएंका यांच्यावतीने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी स्मृतिचिन्हाचा स्वीकार केला. अन्य गौरवमूर्तीमध्ये डॉ. पांडा, प्रबरा चक्रवर्ती, डॉ. गौरव चौधरी, रोमांचक अरोरा, अजित आग्रवाल, निखिल रत्नपारखी, अजिंक्य पाटील यांचा समावेश होता.

  • ध्वनिचित्रफितीचे दिग्दर्शन हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केले असून निवेदक अक्षयकुमार आहे. अभिनेता निखिल रत्नपारखी यांनी त्यात काम केले आहे.
  • ध्वनिचित्रफितीसाठी हिरानी आणि अक्षयकुमार यांनी कोणतेही मानधन न घेता काम केले असल्याचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेता शेखर सुमन यांनी सांगितले.