जीटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हंसा राजपूत यांची आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी मंगळवारी भेट घेऊन विचारपूस केली. त्यांची योग्य ती देखभाल करण्याचे आदेश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.
मरीन लाईन्स येथील मुंबई हॉस्पिटलसमोरील दग्र्यासमोर हंसा यांना  त्यांचा मुलगा टाकून निघून गेला होता. त्यानंतर राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी रुग्णालयात जाऊन राजपूत यांना मदतीचा हात दिला. संध्याकाळी आरोग्य राज्यमंत्र्यांनीही रुग्णालयाला भेट देऊन राजपूत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना योग्य ते उपचार मिळायला द्यावेत असे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले. याशिवाय त्यांच्या मुलाला लवकरात लवकर शोधण्याचे आदेशही पोलिसांना दिले. भाजप खासदार पूनम महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राजपूत यांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले; तसेच त्यांच्या देखभालीकडे लक्ष देण्याची विनंती केली. त्यांच्या मुलाला शोधून त्याच्याविरोधात पालकांची देखभाल करण्याच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.