गेले चार दिवस विदर्भासह आंध्र प्रदेश, तेलंगणासह अनेक राज्यांत उष्णतेची लाट आली असून सोमवारपासून उष्माघातात २०७ लोक मृत्युमुखी पडल्याने देशातील उष्माबळींची संख्या ७५७ वर गेली आहे. सर्वाधिक मृतांची संख्या आंध्र प्रदेश आणि तेलंगण येथे अनुक्रमे १४९ आणि ५१ अशी आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर व वर्धा येथे अनुक्रमे ४६.६ व ४६.५ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले असून राज्यभर उन्हाची काहिली वाढतीच आहे. पुढील पाच दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगणसह उत्तर भारतात तापमापकातील पारा वर चढणार आहे. हरयाणा, चंडिगढ, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा येथे उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. ही लाट ३० मेपर्यंत कायम राहणार आहे. 

पुढील दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण भारतात काही ठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज असून त्यामुळे लोकांना तात्पुरता दिलासा मिळेल, मात्र नंतर उष्म्यातच कमालीची वाढ होईल, अशी भीतीही भेडसावत आहे.
तेलंगण, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधील कमाल तापमान सध्या ४५ अंश सेल्सियसच्या घरात आहे. राजधानी दिल्लीत राजकीय वातावरणाइतकेच खरे तापमानही वाढतच असून पारा ४५ अंश सेल्सियसवर आहे. ओदिशातील अंगुल येथे ४७ अंश सेल्सियस तापमान आहे. आंध्र प्रदेशात सोमवापर्यंत १४९ जण मरण पावल्यामुळे राज्यातील आतापर्यंत मृतांची संख्या ५५१ झाली आहे. त्यातही गुंटूर जिल्ह्य़ात उष्माघाताचे सर्वाधिक १०४ बळी ठरले आहेत. गुंटूरखालोखाल विजयनगरम् ८४, विशाखापट्टणम् ६१, व प्रकाशम् जिल्ह्य़ात ५७ अशी मृतांची आकडेवारी आहे.

मुंबईत ३५ अंश सें. तापमान
* गेला महिनाभर मुंबईकरांना वरच्या पातळीवर जात असलेल्या पाऱ्याने घामाघूम केले आहे. रविवारी ३६.२ अंश सें. कमाल तापमानाची नोंद झाली.
* गेल्या दशकभरातील मे महिन्यातील हे तिसऱ्या क्रमांकाचे तापमान होते. मात्र सोमवार व मंगळवारी कमाल तापमानात घट झाली आहे.
* सोमवारी ३५.८ अंश सें. तर मंगळवारी ३५.२ अंश सें. कमाल तापमान नोंदले गेले. हवामानातील सापेक्ष आद्र्रता वाढली असल्याने उकाडय़ाचे प्रमाण वाढले आहे.
* तापमानात तात्पुरती घट झाली असली तरी नजीकच्या काळात उकाडय़ापासून सुटका होण्याची शक्यता नाही. मुंबईचे कमाल तापमान सरासरी ३५ अंश सें.च्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
* किमान तापमानही २९ अंश सें. खाली येणार नसल्याने रात्रीच्या वेळीही गारवा जाणवणार नाही.

खोळंबलेला मान्सून पुढे सरकला..
दहा दिवसांपूर्वीच अंदमानात दाखल झालेला मान्सून श्रीलंकेपर्यंत येऊन थबकला होता. मात्र आता मान्सूनचे वारे पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवसांत मान्सूनचे वारे पुढे सरकणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. अंदमानात मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे सुखद दिलासा मिळाला असला तरी त्यानंतर मान्सून तब्बल सात दिवस श्रीलंकेच्या दक्षिण टोकापुढे सरकला नाही. आता मात्र मान्सून पुढे सरकण्यासाठी हवामानाची अनुकूल परिस्थिती आहे. साधारण दरवर्षी १ जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होतो. या वर्षी मान्सून ३० मेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.