अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या २४ तासांमध्ये चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. मात्र हे वादळ पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय समुद्र किनारपट्टीपासून दूर जाईल. त्यामुळे भारतीय समुद्र किनारपट्टीला धोका उद्भवण्याची शक्यता कमी आहे. मात्र कोकणपट्टीत वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढत आहे. परिणामी येत्या २४ तासांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रवास पश्चिम दिशेने सुरू होणार आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाणार आहे. असे असले तरी त्याचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन वेधशाळेने सावधानतेचा इशारा दिला आहे.
चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतर वेगवान वारे वाहू लागतील आणि समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या प्रभावामुळे कोकणात वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.