पावसाचे आगमन होताच मुंबईत रेल्वेचे रडगाणे सुरु झाले असून मध्य आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना बुधवारीदेखील मनस्तापाचा सामना करावा लागला. मध्य रेल्वेवरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु होती. तर हार्बर रेल्वेवर मानखुर्दजवळील तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प पडल्याने हार्बरचे वेळापत्रकच कोलमडले. दुपारनंतर आसनगावजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कसाराकडे जाणारी वाहतूक खोळंबली आणि प्रवाशांच्या हालात भर पडली.

गेल्या चार दिवसांपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनाने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला तरी या पावसात रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मंगळवारी रात्रीपासून मुंबई आणि परिसरात मुसधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळीदेखील पावसाचा जोर कायम असल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु होती. तर हार्बर रेल्वेवर मानखुर्दजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा खोळंबली होती. मानखुर्दमध्ये रेल्वेरुळावरील खडी वाहून गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. सध्या हार्बर मार्गावरील वाहतूकही सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे.

मुंबईत चार दिवसात तिसऱ्यांदा रेल्वे वाहतुकीवर पावसाचा परिणाम दिसून आला. रविवारी मुसळधार पावसामुळे कळवा स्थानकात पाणी साचल्याने धीम्या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक खोळंबली होती. तर मंगळवारी सायन स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते.