पावसाचा धमाका सुरूच राहिला असून सलग चौथ्या दिवशी मुंबई, रायगडमध्ये धो धो सरी बरसल्या. विदर्भ वगळता राज्यात सर्वत्रच पावसाने ठाण मांडले असून ही पाऊसखेळी पुढील आठवडय़ातही राहणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने नोंदवला आहे.

डहाणू, पेण, रोहा, हण्र आणि खेड येथे सप्टेंबर महिन्यातील पावसाचे प्रमाण एक हजार मिमीपेक्षा अधिक झाले आहे. आता पालघरमधील पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी रायगडमध्ये सलग आठवडाभर संततधार कायम आहे. शनिवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार रायगडमधील बहुतांश ठिकाणी १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्य़ातही  पावसाचा जोर वाढला. मुंबईत कुलाबा येथे १६६ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पेण येथे २२० मिमी असून रोहा आणि मुरड येथेही एका दिवसात २०० मिमी चा टप्पा ओलांडला गेला.

मराठवाडय़ाला पावसाचा दिलासा मिळाला असून सर्वच जिल्ह्य़ात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी १०० मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ात सर्वाधिक पाऊस बीडमध्ये (१५३ मिमी) पडला. औरंगाबाड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथेही पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी आल्या.

उपग्रहामार्फत घेतल्या गेलेल्या प्रतिमेनुसार राज्यावर मोठय़ा प्रमाणात ढग दिसत असून पुढील पाच दिवसात कोकण किनारपट्टीवर अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही बहुतेक ठिकाणी जोरदार सरी येणार असून विदर्भातही सोमवार, मंगळवारी पावसाच्या मध्यम सरी येण्याची शक्यता आहे.