एका तासात ६८ मिमी पावसाची नोंद

मुंबईकरांना मुसळधार पावसाचा अनुभव नवा नसला तरी गेल्या काही दिवसांत पावसाच्या सरींचा अनोखा खेळ मुंबईत दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री दहा ते अकरा या वेळेत ताडदेव परिसरात तब्बल ६८ मिमी पावसाची नोंद झाली. या प्रचंड पावसामुळे पाणी तुंबण्यापासून ते वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण झाल्या. पाऊस ओसरल्याने पुढील अनर्थ टळला. एकीकडे ताडदेव परिसरात एवढा प्रचंड पाऊस कोसळत असताना गिरगावात मात्र पावसाच्या तुरळक सरी पडत होत्या. पश्चिम व पूर्व उपनगरांत पावसाचा जोर काहीसा कमी राहिला तरी मुलुंड येथे तब्बल १२५ मिमी पावसाची नोंद झाली!

मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या १२ तासांत कुलाबा येथे १६४ मिमी तर सांताक्रूझ येथे ८५ मिमी पाऊस पडला. महानगरपालिकेने हवामानशास्त्र विभागाच्या साहाय्याने शहरात ५० ठिकाणी लावलेल्या स्वयंचलित केंद्रातील माहितीनुसार ग्रॅण्ट रोड, ताडदेव या परिसरात रात्री दहानंतर अतिवृष्टी झाली. साधारण पंधरा मिनिटांत १५ ते २० मिमी पाऊस पडला की तो मुसळधार म्हणून गणला जातो. ग्रॅण्ट रोड येथे अवघ्या अध्र्या तासात ६० मिमीहून अधिक पाऊस पडल्याने या परिसरात पाणी झिरपण्यासाठीही वेळ मिळाला नाही. पावसाच्या माऱ्याने वाळकेश्वरपासून वरळीपर्यंत वाहतूक कोंडी झाली.

विद्युत यंत्रणेत बिघाड

मुसळधार पावसामुळे गिरगाव आणि ग्रँटरोड या भागांमध्ये विजेच्या तारांमध्ये बिघाड होण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तात्पुरती जोडणी करत वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही या भागातील घरांमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. काही ठिकाणी तर जमिनीखालून गेलेल्या विजेच्या तारांमधून आवाजही येत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या. याबाबत बेस्ट प्रशासनाला विचारले असता मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई-गोवा महामार्ग १२ तास ठप्प

अलिबाग : संततधार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील सुकेळी िखडीत दरड कोसळली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल १२ तास ठप्प झाली. नागोठणे परिसराला पुन्हा एकदा पुराचा तडाखा बसला. पेण तालुक्यातील पांडापूर येथे ४० घरांत पाणी शिरले. तर  अलिबाग तालुक्यातील ताडवागळे, परिसरात पोल्ट्रीत पाणी  शिरल्याने हजारो कोंबडय़ा मृत्यूमुखी पडल्या.

फोंडा, भुईबावडा घाटात दरड कोसळली

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे फोंडा घाट आणि भुईबावडा घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. तसेच फोंडा व लोरे येथे घरांत पाणी भरल्याने लोकांना स्थलांतरित करण्याची पाळी प्रशासनासमोर आली. जिल्ह्य़ात पावसाने दाणादण उडवून दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सकाळी ८ वाजता सरासरी ५३.९५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

मराठवाडय़ाला झोडपले

औरंगाबाद :  मराठवाडय़ात बीड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या चार जिल्हय़ांना पावसाने  झोडपले. बीड जिल्हय़ांतील ४० महसूल मंडलात अतिवृष्टी झाली असून, १० वर्षांत पहिल्यांदाच या जिल्हय़ाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने १३ गावांना पाण्याने वेढा दिला आहे. तालुक्यातील नागझरी येथे वैशाली कळसुले (वय ३३) ही महिला वाहून गेली, तर शिरूर तालुक्यातील रायमोहा ते टाकळीवाडी दरम्यान संदीप गर्जे हा तरुण वाहून गेला आहे.