राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून काल रात्रीपासून राज्यातील सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अजूनही अनेक भागांत पावसाची संततधार सुरु आहे. राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरण क्षेत्रात चांगला पाऊस बरसत असल्याने उपयुक्त पाणी साठ्यात वाढ होत आहे. त्यासुळ शहरांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची आशा आहे.

पुण्यात पावसाची संततधार सुरु….

पुणे शहरात मागील महिन्याभरापासून पावसाने दडी मारली होती. मात्र आज पुन्हा पहाटेपासून पावसाने जोरदार हाजेरी लावत पुणेकरांना दिलासा दिला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा वरुणराजाने पुण्यात समाधानकारक हजेरी लावल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच मागील महिन्याभरापासून वरुणराजाने दडी मारली होती. मात्र, आज पहाटेपासून पुणे शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हाजेरी लावली आहे. तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणाच्या पाणीसाठ्यात चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत चारही धरणात मिळून २४.८१ टीएमसी आणि ८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्याचबरोबर अद्यापही धरण क्षेत्रात संततधार सुरु असल्याने येत्या काही तासांत धरण साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

मावळ परिसरात जोरदार सरी, तर लोणावळ्यात संततधार

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार हजेरी लावली. राज्यात दाखल झालेला मान्सूनने अनेक दिवसांपासून दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र, कालपासूनच ढगाळ वातावरण असल्याने मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. लोणावळ्यात पावसाची संतत धार सुरू असून २४ तासात ५१ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. तसेच १ जानेवारीपासून आजपर्यंत ४ हजार ४० मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.

तर पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या पवना धरण हे शंभर टक्के भरले आहे,आज दुपारी १२ वाजेपर्यंत ३० मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर १ जानेवारी पासून आजपर्यंत २४९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मान्सून सुरू झाल्यापासून पावसाने राज्यभरासह दडी मारली. मात्र, लोणावळा, मावळ, पिंपरी-चिंचवड शहरात पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे भुशी डॅम, पवना धरण या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस हुलकावणी देत होता, त्यामुळे शहरवासीय चिंतेत होते.

मराठवाड्यात पावसामुळे पाणीच पाणी

अनेक दिवसांपासून दडून बसलेल्या पावसाने मराठवाड्यात दमदार हजेरी लावल्याने येथिल शेतकरी सुखावला आहे. पावसाअभावी येथे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले होते. या पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठा फायदा होणार आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४९.१५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. बीड, पाटोदा, गेवराई, शिरूर, अंबाजोगाई आणि केज या ६ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

अतिवृष्टीचा वेधशाळेचा इशारा खोटा ठरतोय की काय, असे वाटत असतानाच शनिवारी रात्री पासून मराठवाडय़ात पावसाला सुरुवात झाली. रिमझिम पावसानंतर रात्रभर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दीर्घ प्रतिक्षेनंतर आलेल्या पावसाने शेतकरीवर्गात समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्हयात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तर नांदेडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.

वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शनिवारी मराठवाडय़ात ढगाळ वातावरण होते. पावसाची एखादी सर यायची, पण त्यात जोर नव्हता. पुन्हा एकदा रस्ते ओले होतील, एवढाच पाऊस औरंगाबादमध्ये होता. उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्हय़ातही पावसाची भुरभुर सुरू होती. मात्र, मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. मराठवाडाभर हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. नांदेड येथे जोरदार पाऊस झाला असून आयुक्तांच्या घरातही पाणी शिरले होते. दीर्घ प्रतिक्षेनंतर पाऊस झाल्यामुळे पिकांना काही दिलासा निर्माण झाला आहे. तसेच वातावरणात गारवा निर्माण झाला असून बैल पोळ्याच्या अगोदर पाऊस बरसल्याने बळीराजाही सुखावला आहे.

नाशिकमध्ये अतिवृष्टी

दोन आठवडे काहीसा विसावलेला वरुणराजा काल रात्रीपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार कोसळला. जिल्ह्यात रात्रभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासात १६.८५ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. आज (दि.२०) झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी घाटावरील गाडगे महाराज पुलाखाली उभे असलेले चारचाकी वाहन पाण्यात अडकले. स्थानिक नागरिक तसेच अग्निशामकदलाच्या जवानांनी एक तास शर्थीने प्रयत्न करून हे वाहन पाण्याबाहेर काढले.

गेल्या २४ तासांत नाशिकमध्ये १६.८५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातभरात ८६८.०४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ६५ मिमी तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६२ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली.
जिल्ह्यातील गंगापूर धरणातून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात २ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यांनतर धरणातुन दुपारी एक वाजता ४६८० क्यूसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी पुन्हा वाढली आहे.