गुजरातमध्ये धो धो बरसणाऱ्या पावसाने कोकणातही जोरदार वृष्टी सुरू ठेवली आहे. मुंबईच्या विविध भागात सोमवारी पावसाच्या जोरदार सरी आल्या. मंगळवारीही मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार असून, बुधवारपासून मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसाच्या मध्यम सरी येण्याची शक्यता आहे.
राजस्थान आणि गुजरातवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून गुजरातमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. याच्याच परिणामी कोकण परिसरालाही पावसाने झोडपून काढले. ठाणे, रायगड या भागात पावसाचा जोर वाढला असून मुंबईतही पावसाच्या काही जोरदार सरी आल्या. त्यातही उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंतच्या १२ तासांत सांताक्रूझ येथे दमदार पावसाची नोंद झाली. मंगळवारीही मुंबईसह कोकणात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी होईल मात्र तरीही पुढील पाच दिवस पावसाच्या सरी येत राहतील. त्याचवेळी बुधवारपासून मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित आहेत. पश्चिम बंगालजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गुरुवारपासून विदर्भातही पावसाच्या सरी येतील. मराठवाडय़ात मात्र नजिकच्या काळात पावसाची शक्यता नाही.
सहा दिवसात साडेतीन महिन्यांचा जलसाठा
पावसाने महिन्याभरानंतर केलेल्या दमदार पुनरागमनानंतर शहरावरील जलसंकट दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्षभरासाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठय़ाच्या सुमारे अर्धा साठा जमा झाला आहे. गेल्या मंगळवारी २१ जुलै रोजी तलावातील साठा अडीच लाख दशलक्ष लिटपर्यंत खाली गेल्यावर पाणीकपातीच्या संकटाचे ढग गोळा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र ठाणे- नाशिक तलावक्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यावर सोमवारी, २७ जुलै रोजी पाण्याचा साठा सहा लाख दशलक्ष लिटरवर पोहोचला. हा साठा सहा महिन्यांसाठी पुरेसा आहे.
दोघांचा बुडून मृत्यू
मुंबई : समुद्रात पोहायला गेलेले दोन तरूण रविवारी बेपत्ता झाले होते. त्यातील एकाचा मृतदेह सोमवारी पहाटे सापडला असून दुसऱ्याचा शोध अद्याप लागलेला नाही. रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास जुहू चौपाटी येथील क्युलिप स्पॉटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ १५ वर्षांचा मुलगा बुडाला होता, तर संध्याकाळी सहाच्या सुमारास मार्वे खाडी येथे आणखी एक जण बुडाल्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दल, जीवरक्षक व नागरी संरक्षण दलाने बुडालेल्यांचा शोध घेतला.