चालकांच्या बेमुदत संपाचा फारसा परिणाम नाही; मात्र प्रवाशांची लूट

ओला, उबरच्या काही चालकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप आणि त्यातच मंगळवारी सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे मुंबईकरांना खासगी टॅक्सींनी साथ देण्याऐवजी अक्षरश: जादा भाडे आकारून लुबाडणूक केली. त्यातच मुंबईतील काही भागांत ओला, उबर टॅक्सी मिळणेही कठीण झाल्याने मुंबईकरांना काळी-पिवळी टॅक्सी, रिक्षा व बेस्टने साथ दिली. सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे ओला, उबर कंपन्यांनी चालकांना दिलेले आश्वासन यासह चालकांना सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी ओला व उबरच्या चालकांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला. मात्र या संपाचा मुंबईसह महानगर क्षेत्रात फारसा परिणाम झाला नाही. काही मोजकेच चालक सोडता या संपात मोठय़ा प्रमाणात चालक सामील झाले नाहीत. जोपर्यंत मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच राहील, अशी भूमिका चालकांनी घेतली आहे.

विविध मागण्यांसाठी ओला-उबरच्या काही चालकांनी १९ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला. सकाळच्या सुमारास मुंबईतील काही भागांतच त्याचा परिणाम जाणवला. ३० ते ४० टक्के ओला-उबर या सकाळच्या सत्रात उपलब्ध होत नव्हत्या. ६० टक्के ओला, उबरच या रस्त्यावर धावत होत्या, परंतु त्याचे भाडे मात्र जास्त आकारण्यात येत असल्याचे हे टॅक्सी आरक्षित करताना दिसत होते. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत होती. उत्तर मुंबई आणि ठाण्याच्या काही भागात ओला, उबर टॅक्सी कमी प्रमाणातच धावत होत्या. संप होत असतानाच त्यातच पावसाचीही भर पडल्याने टॅक्सी सेवेवर त्याचा परिणाम झाला. यासंदर्भात ओला-उबर ऑपरेटर असलेले याकुब मेहता यांनी सागितले की, ओला, उबर कंपनीत रुजू होताना आम्हाला सव्वा लाख रुपये उत्पन्न देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते. हे उत्पन्न मात्र कंपनीकडून दिले जात नाही. ते उत्पन्न आम्हाला मिळावे. त्याचप्रमाणे चालकांच्या सुरक्षेसाठी कंपनीने इन्शुरन्स काढावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. जवळपास आठ महिन्यांपासून मागण्या केल्या जात असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ओला कंपनीच्या प्रवक्त्याकडे विचारणा केली असता, आमची सेवा विनाअडथळा सुरू असल्याचे सांगितले आणि असा कोणताही संप झाला नसल्याची माहिती दिली.