टप्प्याटप्प्याने प्रवास करण्याचे वैशिष्टय़ दाखवत मान्सूनने यावेळीही मुंबईसह कोकणात जोरदार पुनरागमन केले आहे. आठवडाभराच्या तुरळक सरींनंतर आलेल्या पावसाने ठाणे परिसरात मुसळधार वृष्टी केली. मुंबईत तसेच कोकणात इतरत्र मात्र मध्यम स्वरुपाच्या सरी आल्या. येत्या ४८ तासांत मुंबईत मध्यम स्वरुपाच्या सरी येणार असून काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून कोकण परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्टा मंगळवारी गुजरातपर्यंत पसरला असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाची संततधार सुरू होती. त्यातही ठाणे परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला. ठाण्यातील बहुतेक भागांत मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली.
ठाणे वगळता मुंबईसह कोकणातील इतर भागांत पावसाच्या मध्यम सरी सुरू होत्या. मुंबईत मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत कुलाबा येथे २६.६ मिमी आणि सांताक्रूझ येथे ४८.३ मिमी पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाचा जोर आणखी कमी झाला. रात्री साडेआठपर्यंत कुलाबा येथे ११.६ मिमी व सांताक्रूझ येथे ४५.३ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक येथे इगतपुरी व ओझरखेडा येथे पावसाने २०० मिमीचा पल्ला पार केला.
धरणांत घसघशीत पाणीसाठा
राज्यभरातील पावसाने, विशेषत: प. महाराष्ट्रातील धरणांमध्ये पाणीसाठय़ात घसघशीत भर पडली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांच्या काठावर दमदार पाऊस कायम असल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळताना ठिकठिकाणच्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. या परिसरातील सर्वच धरणांचा पाणीसाठा झपाटय़ाने वाढला १५ टक्क्यांवरून तो ७२.५९ टक्क्य़ांवर गेला आहे. यंदाच्या मोसमात ही धरणे भरून वाहतील असेच चित्र आता निर्माण झाले आहे.