सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार (महाराष्ट्र दिन) अनेकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे अनेकांनी मुंबईबाहेर जाण्याचे प्लान्स केले आहेत. मात्र रविवारी सकाळी मुंबईतून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचताना वाहतूक कोडींचा सामना करावा लागतो आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या भागात तब्बल पाच किलोमीटरहून अधिक वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सुट्टी साजरी करायला निघालेल्या अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. सुट्टी असल्याने कोकण आणि गोव्याकडे निघालेल्या अनेकांनादेखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

सुट्टी असल्याने मुंबईबाहेर जात असलेल्या अनेकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आहे. तर मुंबईत प्रवास करतानादेखील प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेचे रडगाणे सुरू असल्याने सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे हाल होत आहेत. कळव्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.