स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि सोमवारी दहीहंडी.. सलग चार दिवस आलेल्या सुट्टय़ांचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील वाहतूककोंडीचा फटका बसला. द्रूतगती मार्गावरून सुसाट धावणाऱ्या गाडय़ांची गतीच या वाहतूककोंडीमुळे मंदावल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे दृश्य होते. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. सुमारे अडीच लाख पर्यटकांना या वाहतूककोंडीचा फटका बसला असावा, असा अंदाज आहे.
सलग सुट्टय़ांमुळे अनेक मुंबईकरांनी लोणावळा-खंडाळा परिसरातील धबधबे, रिसॉर्ट्सकडे धाव घेतली. शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईहून लोणावळ्याकडे येणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे खालापूर टोलनाका व अमृतांजन पूल भागात सुमारे आठ-दहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने द्रूतगती महामार्ग अक्षरश ठप्प झाला होता. भुशी धरणाकडे जाणारे रस्तेही मुंबई आणि पुण्याकडून येणाऱ्या पर्यटकांमुळे गर्दीने फुलले होते. या ठिकाणी अक्षरश पायी चालायलाही जागा नव्हती. त्यामुळे भुशी डॅमकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाल्याने एकाच जागी तीन-चार तास वाहने उभी होती. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर महामार्ग पोलिसांनी भुशी धरणाकडील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्यास आळा बसला. मात्र, वाहतूककोंडीमुळे जागीच अडकलेल्या वाहनांमधील लोकांचे प्रचंड हाल झाले.