अंमलबजावणी सुरू; हेल्मेट नसल्यास १०० रुपये दंड
तुम्हाला मित्राच्या मोटारसायकलवर मागे बसून फिरण्याची इच्छा असेल तर आता घरातूनच हेल्मेट घेऊन बाहेर पडावे लागेल. कारण मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने मोटारसायकलस्वाराच्या मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेटसक्ती केली आहे. शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून उत्तरोत्तर ही कारवाई कठोरपणे करण्यात येईल, असे सूतोवाच पोलिसांनी केले आहे.
रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेटसक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी जोरदार मोहीम राबविली होती. यात हजारो मोटारसायकलस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ आता मोटारसायकलस्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशांना (पिलीयन रायडर) हेल्मेट सक्तीने घालण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले काढले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी एकाएकी कारवाईला सुरुवात केल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. परंतु चालक-सहप्रवासी यांनी हेल्मेट घालणे कायद्याने बंधनकारक आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या जीविताच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. हेल्मेटसक्ती उत्तरोत्तर अधिक कठोर होत जाईल असे वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्पष्ट केले. मोटारसायकलवर चालक आणि सहप्रवासी यांना हेल्मेट घालणे कायद्याने बंधनकारक असल्याचे सहपोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारंबे यांनी स्पष्ट केले.