30 May 2016

संयम राखण्यात सहकार्य करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून निर्माण झालेला वाद तूर्तास थांबवावा आणि आम्हाला संयम राखण्यात

विशेष प्रतिनिधी, मुंबई | November 21, 2012 5:18 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून निर्माण झालेला वाद तूर्तास थांबवावा आणि आम्हाला संयम राखण्यात सहकार्य करावे, अशी विनंती शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हात जोडून केली आहे. मात्र स्मारकाचा निर्णय लाखो कडवट शिवसैनिकच घेतील. शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांमध्ये मी पडणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
अंत्यसंस्कार झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक व्हावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी जाहीर केले. त्याला काही स्वयंसेवी संघटना आणि परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. हे स्मारक मैदानात न होता अन्य जागेत व्हावे, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्धीमाध्यमातून येत असल्याने हा वाद थांबविण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ठाकरे यांचे हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा वाद घालण्याची ही वेळ नाही. ठाकरे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेना परिवार धक्क्य़ातून सावरला नसताना स्मारकाचा वाद का निर्माण व्हावा, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या निवेदनात उपस्थित केला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या अंतिम दर्शनासाठी उसळलेला २५ लाखांचा जनसागर संयम आणि शिस्तीत वागला. मी त्यांच्या संयमाला दाद व धन्यवाद देतो, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.    

स्मारकावरून वाद घालणाऱ्यांनी आणि टीकेचा सूर काढणाऱ्यांनी आमच्या सगळ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. आम्हाला संयम राखण्यात त्यांनी सहकार्य करावे, अशी हात जोडून नम्र विनंती आहे.
– उद्धव ठाकरे

स्मारकाला आठवलेंचा पाठिंबा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्यास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला आहे.

इंदू मिल आंबेडकर स्मारकासाठीच
पंतप्रधानांच्या आदेशानुसार इंदू मिलची संपूर्ण जमीन आंबेडकर स्मारकासाठीच दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना दिले

First Published on November 21, 2012 5:18 am

Web Title: help to keep abstinence