पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा गृह खात्याने दिला आहे.
पंजाबमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महानगरांमधील पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर राज्याच्या गृह खात्याकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड्स यांनाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. नाशिकमध्ये सध्या कुंभमेळ्यामुळे अनेक साधू-महंत तिथे जमले आहेत. यामुळे तिथेही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येते आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.