आंबेडकर भवन परिसरात प्रवेश करण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

दादर येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस उद्धवस्त केल्याच्या प्रकरणाला शुक्रवारी नवे वळण मिळाले. आंबेडकर भवनाच्या परिसरात कुणालाही शिरकाव करण्यास तसेच त्याची पुनर्बाधणी वा ते पूर्ववत करण्याच्या प्रयत्नाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी मज्जाव केला. त्यामुळे शनिवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली ‘श्रमदाना’तून आंबेडकर भवन पुन्हा बांधण्याच्या मोहिमेलाही आपसूकच स्थगिती मिळाली आहे. एवढेच नव्हे, तर न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून आंबेडकर भवनाच्या परिसरात प्रवेश करणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्तांनी आवश्यक ती कारवाई करावी, असेही न्यायालयाने बजावले आहे.

‘श्रमदाना’तून आंबेडकर भवन पुन्हा उभारण्याच्या विरोधात ‘पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट’ने उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांनी हे आदेश दिले.