पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊ जणांचा बळी घेतल्याप्रकरणी संतोष माने याला दोषी ठरविण्याचा पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे नमूद करीत उच्च न्यायालयाने बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब केले. त्याचप्रमाणे त्याला सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवायची की ती कमी करून त्याचे जन्मठेपेत रूपांतर करायचे याबाबतचा युक्तिवाद न्यायालयात ४ ऑगस्टपासून होणार आहे.
न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर माने याने फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या अपिलावर सुनावणी सुरू आहे. आपली मानसिक स्थिती नीट नाही. अपघाताच्या वेळीही ती तशीच होती आणि आपल्यावर त्या अनुषंगाने उपचार सुरू असल्याचा दावा करीत माने याने फाशीला आव्हान दिले आहे. न्यायालयाने त्याचा हा दावा फेटाळून लावत त्याला दोषी ठरविण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. हा निर्णय कायम ठेवण्याची कारणे मात्र खंडपीठाने सध्या तरी स्पष्ट केलेली नाही.